विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis निवडणुकीतील बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या काही मतदारसंघातही बंडखोरी झाली असून आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी सांगितले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवसापर्यंत महायुतीच्या जागांवर दाखल झालेले क्रॉस फॉर्म मागे घेतलेले असतील, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली, असेही म्हटले.Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नामांकनानंतर काही ठिकाण क्रॉसफॉर्म आले होते. त्यासंदर्भात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी आम्ही सर्वांची बैठक झाली. जवळपास सर्व अडचणी आम्ही संपवल्या आहेत. जे परत घेतले पाहिजे असे क्रॉसफॉर्म परत घेतले जातील. काही ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांसमोर क्रॉस बंडखोरी झाली आहे. त्यासंदर्भात निती तयार केली असून तिकीट नसताना उमेदवारी भरणाऱ्यांशी चर्चा करत आहोत. त्यांना माघार घ्यावी यासाठी तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी पक्षांतर्गत आमचे कार्यकर्ते उभे राहिले आहेत. त्यांना विश्वास घेऊन चर्चा करुन त्यांनी माघार घ्यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
…पण गोपाळ शेट्टी पक्षशिस्तही मान्य करतात
गोपाळ शेट्टी भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ता राहिलेले आहेत. ते अनेकवेळा आग्रही असतात, पण ते पक्षशिस्तही मान्य करतात. गोपाळ शेट्टी यांना सगळी परिस्थिती समजावून सांगू. तसेच त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपच्या मागे राहण्याची भूमिका घ्यावी, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे फडणवीस म्हणाले.
राज्यात भाजपचा नाही तर महायुतीचा मुख्यमंत्री
मी राज ठाकरेंचा आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छा नम्रपणे स्वीकारतो. पण महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नसून महायुतीचे सरकार येणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री असेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज ठाकरेंनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली
राज ठाकरे भाजपाला उघडपणे पाठिंबा देत आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांचे मत भाजपापासून दूर जाईल का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, याबद्दल मी लोकसभेलाच बोललो आहे. राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. क्षेत्रीय अस्मितेला भाजपचे नेहमीच समर्थन राहिले आहे. राष्ट्रीय अस्मितेचा स्वीकार होणे महत्त्वाचे असते. ती राष्ट्रीय अस्मिता म्हणजेच हिंदुत्व हे राज ठाकरेंनी स्वीकारले आहे, असे फडणवीस म्हणाले.
अमित ठाकरेंबाबत चर्चा सुरू
अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत आमची सगळी बोलणी सुरू आहे. राज ठाकरे, एकनाथ शिंदे, आशिष शेलार आमची चर्चा सुरू असून सगळे एकत्र राहून मार्ग निघाला पाहिजे, असा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App