विशेष प्रतिनिधी
नागपूर : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे गेले असताना एका मुलाखतीत त्यांना त्यांच्या नगरसेवकाच्या काळातला किस्सा विचारण्यात आला, यावर फडणवीसांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. तसेच महापौर आणि नगरसेवकाचा जॉब एकदम टफ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो, असेही फडणवीस यांनी गंमतीने विधान केले.Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी 21 व्या वर्षी नगरसेवक झालो. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका वगैरे काढल्या आणि पहाटे 4 वाजता मी आमच्या घराच्या हॉलमध्ये झोपलो. आणि सकाळी 7 वाजताच घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर एक गृहस्थ उभे होते. मी त्यांना विचारले इतक्या सकाळी सकाळी कसे काय? त्यावर म्हणाले, माझे गटार चोक झाले आहे म्हणून तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे आलो. त्या दिवशी आपण काय स्वीकारले आहे हे मला समजले.Devendra Fadnavis
ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी गमतीने म्हणतो की, ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो. पण मला असे वाटते की तेव्हाच्या महानगरपालिकेत आणि आताच्या महानगरपालिकेत खूप फरक पडला आहे. तेव्हा नागपूर शहर विकासाची आस बघत होते. मी महापौर झालो तेव्हा नागपूरमध्ये पाण्याच्या आठ टाक्या होत्या, आज 108 पाण्याच्या टाक्या आहेत. हा नागपूरमधला बदल आहे. आज नागपूर एक आधुनिक शहर म्हणून बघायला मिळत आहे.
आमच्या काळात दिवे लावण्याचे दिव्य होते
आमचा तो काळ होता जेव्हा नगरसेवक फक्त गटर, रस्ता आणि दिवे याचा विचार करायचा. तेव्हा अक्षरशः स्पर्धा लागायची की जो स्टोअर किपर असायचा, ज्याच्याकडे ते सगळे दिवे ठेवलेले असायचे, त्याला पटवून तो दिवा लावण्याचे एक दिव्य होते. आता या सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
..तर देवेंद्र फडणवीस नगरसेवक झाले नसते
तेव्हाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नसत्या तर देवेंद्र फडणवीस नगरसेवक झाले नसते, यावर बोलताना त्यांनी सांगितले की, हे खरे आहे. मला ज्यावेळी सांगितले की या वॉर्डमधून लढायचे आहे. त्यावेळी मी कोणाला सांगितले नाही की माझे वय झाले नव्हते, माझे वय पूर्ण व्हायचे बाकी होते. पण तेव्हा ती निवडणूक काही कारणांमुळे पुढे ढकलली गेली आणि माझे वय त्या निवडणुकीसाठी भरले, असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App