विशेष प्रतिनिधी
मुंबई : मी पाच वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलो. वसंतराव नाईक यांच्यानंतर संपूर्ण टर्म मुख्यमंत्री राहणारा मी एकमेव मुख्यमंत्री ठरलो. त्यामुळे आता मला मुख्यमंत्री पदाची मुळात लालसाच उरलेली नाही, अशा परखड शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले आणि ते त्या स्पर्धेतून स्वतःहून बाहेर पडले. अर्थात भारतीय जनता पार्टी देईल, ती जबाबदारी स्वीकारू, असे वक्तव्यही फडणवीस यांनी करून राजकारणातल्या सगळ्या शक्यता ओपन ठेवल्या.
एबीपी माझाच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदा संदर्भात स्पष्ट वक्तव्य केले. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही शक्तींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी कुठलेही नाव पुढे न करता ते नाव गुलदस्त्यातच ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्पर्धा कधी नव्हे, एवढी खुली झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे. कारण सध्या ते भाजपचे महाराष्ट्रातले सगळ्यात प्रभावी नेते आहेत.
महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवत आहे, पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड आणि घटक पक्षांचे नेते एकत्र बसून घेतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ केवळ महाविकास आघाडीतच नव्हे, तर महायुती देखील मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा खुली आहे असेच संकेत फडणवीस यांनी आपल्या वक्तव्यातून दिले.
उद्धव ठाकरेंच्या महायुतीतल्या प्रवेशाबाबत 23 नोव्हेंबरला सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल, असे सांगून फडणवीसांनी भविष्याच्या राजकारणात नेमके काय दडले आहे, या संदर्भात जास्त बोलायला नकार दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App