विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. (MADC) आणि फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल यांच्यात नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे प्रदर्शन, कन्व्हेन्शन, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
या करारांतर्गत नागपूर येथे सर्व सोयीसुविधांनी युक्त, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जागेची निवड सर्व प्रकारच्या परिवहन सुविधांशी उत्तमरीत्या जोडणारी असावी, तसेच या केंद्राची अंतर्गत रचना नागपूरचा समृद्ध इतिहास अधोरेखित करणारी असावी, अशा सूचना केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, नागपूरमधील हे कन्व्हेन्शन सेंटर केवळ प्रदर्शन आणि कार्यक्रमांसाठी नसून सांस्कृतिक उपक्रमांचे व्यासपीठ बनावे. हे केंद्र नागपूरचे आकर्षण वाढवणारे, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि पर्यावरणपूरक वास्तूचे आदर्श उदाहरण ठरेल.
स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटेनियो यावेळी म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्यात चांगले संबंध आहेत. यामुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होत आहेत. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्य नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहे, याची दखल जगाने घेतली आहे. मुंबई हे भारताचेच नव्हे, तर दक्षिण आशियाचे ‘पावर हाऊस’ बनत आहे. त्यामुळे मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्रासोबत नक्कीच स्पेनला काम करायला आवडेल, अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राचा गौरव केला.
यावेळी फिरा बार्सिलोना इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App