विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय्य सहाय्यक मनाेज मुंडे देवासारखे धावून आल्याने गाेवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीचा पेन्शनचा लढा तब्बल वीस वर्षानंतर यशस्वी झाला. लालफितशाहीच्या कारभारामुळे प्रलंबित असलेली अनुसयाबाई वैजनाथ नवले (रा. सेलू, जि. परभणी) यांची पेन्शन सुरू झाली आहे. आणि थोडी थोडकी नव्हे, तर दरमहा २६ हजारांहून अधिक रक्कम त्यांना मिळणार आहे. Devendra Fadanvis office brings smiles on the face of 87 year old widow of freedom fighter
अनुसयाबाई यांचे पती वैजनाथ नवले हे गाेवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक. गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीच्या लढ्यात भाग घेतला. त्यांचे १९९४ साली निधन झाले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गाेवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांसाठी २० जून २००३ पासून पेन्शन योजना सुरू केली होती. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या पश्चात पत्नीलाही पेन्शन देण्याची तरतूद होती. ही माहिती मिळाल्यावर अनुसयाबाई यांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला. मात्र, हा प्रस्ताव पुढे गेला नाही. लालफितीत अडकून बसला. त्यांच्या अर्जावर धूळ जमा झाली होती.
दिल्ली येथे कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक मनाेज मुंडे यांना या आजींच्या लढ्याची माहिती मिळाली. त्यांनी गृह मंत्रालयाच्या स्वातंत्र्यसैनिक पेन्शन विभागाशी संपर्क साधला. अनुसयाबाई यांची भेटीची वेळ ठरविली. संबंधित अधिकाऱ्याला सर्व प्रकरण सांगितले. अनुसयाबाई या कार्यालयात गेल्यावर तातडीने त्यांचे काम मार्गी लागले. या अधिकाऱ्याने त्यांची आस्थेने विचारपूसही केली.
त्यानंतर संबंधित विभागाकडून याबाबतचे आदेश निघावेत, यासाठी मुंडे यांनी पाठपुरावा चालूच ठेवला. अखेर २६ ऑगस्ट राेजी अनुसयाबाई यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. मनाेज मुंडे यांनी नातवासारखी काळजी घेतल्याने या आजी भारावून गेल्या हाेत्या. त्यांनी फडणवीसांचे मनोमन आभारही मानले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App