नाशिक : नाशकात भाजप प्रवेशाची भाऊगर्दी, आपापसांतच करणार धुमश्चक्री; विरोधकांचा गोट रिकामा करायची खेळी!!, अशी नाशिकच्या राजकारणाची अवस्था झालीय. सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेना यांनी विरोधकांच्या पक्षप्रवेशाचा असा काही धडाका लावलाय की, त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये महापालिका निवडणूक लढण्याची क्षमता असणारे सगळे कार्यकर्ते तरी उरणार आहेत का??, अशा सवाल तयार झालाय. पण त्याचवेळी भाजप पक्षप्रवेशासाठी कोणतीही चाळणी न लावल्याने भाजपच्या विश्वासार्हतेवर देखील ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये 100 + नगरसेवक निवडून आणायचे टार्गेट ठेवल्याने ते धडाधड पक्ष प्रवेश देत सुटलेत. भाजपच्या तिन्ही आमदारांना न विचारता हे पक्ष प्रवेश होत आहेत. आमदार सीमा हिरे यांचा सुधाकर बडगुजर तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध असताना त्यांचा पक्षप्रवेश झाला. आमदार राहुल ढिकलेंचा गणेश गीतेंच्या पक्षप्रवेशाला विरोध असताना त्यांचाही प्रवेश झाला. त्यांच्या पाठोपाठ आज नाशिक मधले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले 10 पदाधिकारी, माजी नगरसेवक भाजपमध्ये येत आहेत. यामध्ये दरोड्याचा आरोप असणाऱ्या मामा राजवाडेंचाही समावेश आहे. त्यामुळे आता भाजप “पार्टी विथ डिफरन्स” उरलेली नाही हे नाशिक मधून तरी दिसून आले.
– यांचा होणार पक्षप्रवेश
सुनील बागुल, मामा राजवाडे, गणेश गीते, सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजणे, कमलेश बोडके, बाळासाहेब पाठक, गुलाब भोये, कन्नू ताजणे, शंभू बागुल, अजय बागुल या आपापल्या परिसरामधल्या हेवीवेट्सना भाजपने प्रवेश नगरसेवक वाढवायचा प्रयत्न चालविला आहे. पण त्याचवेळी भाजप मधल्या निष्ठावंतांना दूर ठेवल्याचे यातून दिसून येत आहे.
भाजपने कुठलीही चाळणी न लावता प्रवेश दिल्याने भाजपमध्ये प्रवेशाची भाऊगर्दी, आपापसांत करणार धुमश्चक्री आणि विरोधकांचा गोट रिकामा करायची खेळी!!, हीच स्ट्रॅटजी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून विरोधी प्रबळ उमेदवार देखील आपल्याच विचाराचा उभा करायची ही यातली खरी गोम आहे. यातून आपापसांत लढाई होईल आणि खरा विरोधक अस्तित्वातच राहणार नाही. पक्षात सगळ्यांना प्रवेश देऊन भाऊगर्दी झाल्यावर निवडणुकीत बंडखोरी होणार याची भाजपच्या नेतृत्वाला जाणीव आहे. त्यात नवीन काही नाही, पण आपापसांमध्येच लढाई करून भांडी वाजवून एवढा कल्लोळ करायचा की विरोधकांचा आवाजही लोकांपर्यंत पोहोचता कामा नये, असा डाव यातून भाजपने खेळला आहे.
अर्थात निवडणुकीचे घोडा मैदान अजून काही महिने लांब आहे. गोदावरीतून बरेच “राजकीय पाणी” वाहून जायचे आहे. याच दरम्यान ठाकरे – पवारांचे पक्ष बऱ्याच वेळा “कमी – जास्त” होणार आहेत. त्याचेही पडसाद नाशिकमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाहीत. या राजकीय गदारोळात काँग्रेस नावाचा राष्ट्रीय पक्ष मात्र कुठेच दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App