विशेष प्रतिनिधी
नाशिक : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माणिकरावांच्या जुन्या भ्रष्टाचाराचा फटका महायुतीच्या फडणवीस सरकारला बसतो आहे.
माणिकरावांच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण तब्बल 29 वर्षांपूर्वीचे म्हणजे 1995 चे आहे. आपण अल्प उत्पन्न गटातले आहोत, असे दाखवून माणिकरावांनी आणि त्यांच्या भावांनी बनावट कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री कोट्यातून नाशिक मध्ये प्राईम लोकेशनवर चार फ्लॅट मिळवले, त्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणाने माणिकरावांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणले आहेत पण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भ्रष्ट उद्योगामुळे महायुतीचे सरकार अधिक अडचणीत सापडले आहे.
कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात फ्लॅट उपलब्ध करून दिला जात असे. त्यासाठी संबंधित लाभार्थीला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत असत. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात “निर्माण व्हूयू” अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून चार फ्लॅट मिळवले होते त्यापैकी दोन नंतर माणिकरावांनी स्वतःच्या नावावर करून घेतले. या सगळ्यांचा वापर कोकाटे बंधूंनी आज तागायत केला आजही माणिकरावांच्या नावाची पाटी त्या घरावर आहे.
त्यावेळचे मंत्री तुकाराम दिघोळे यांचे माणिकराव हे कट्टर समर्थक होते. त्यावेळी त्यांचाच वशिला लावून माणिकराव आणि त्यांच्या बंधूंनी मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट मिळवला होता. पण नंतर तुकाराम दिघोळे आणि माणिकराव यांच्यात राजकीय दृष्ट्या वाजले. दोघांमध्ये राजकीय वैर उत्पन्न झाले. त्यामुळे माणिकरावांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तुकाराम दिघोळे यांनीच केस दाखल केली होती. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने १९९७ मध्ये चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिक कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात पूर्ण झाली. गुरुवारी न्यायालयाने राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या बाबतची माहिती सरकारी अभियोक्ता ॲड. पूनम घोडके यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. ॲड. घोडके यांनी सरकारी पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणात आणखी दोन संशयित होते. त्यांची पुराव्याअभावी मुक्तता झाली. संबंधितांच्या सदनिकांचा वापरही कोकाटे बंधुंकडून होत असल्याचे चौकशीत समोर आले होते. माणिकराव आणि त्यांचे बंधू अल्प उत्पन्न गटातले नाहीत कारण माणिकराव यांच्या नावावर गायरान जमीन होती. त्यांचे वडील देखील कोपरगाव साखर कारखान्यावर संचालक होते त्यांच्या जमिनीतून 100 ते 150 टन ऊस कारखान्याला जात होता, असे पुरावे माणिकरावांच्या विरोधात न्यायालयात सादर करण्यात आले. ते न्यायालयाने गृहीत धरले. त्यानंतर माणिकरावांना शिक्षा केली.
आमदारकी, मंत्रिपदही धोक्यात ?
न्यायालयाने माणिकरावांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची आमदारकी आणि पर्यायाने मंत्रिपदही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे, पण माणिकरावांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App