नाशिक : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले 12 मंत्री वगळले त्यापैकी पाच-सहा जणांनी बंडाचे झेंडे फडकवले. त्यात एकही भाजपचा बंडाचा झेंडा नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यातून बंडाचे झेंडे फडकले. त्यातही अजितदादांच्या राष्ट्रवादीतून छगन भुजबळांचा बंडाचा झेंडा जास्त उंच ठरला. ते आज काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत असल्याच्या बातम्या आल्या. त्याचबरोबर अजितदादा नॉट रिचेबल झाल्याच्याही बातम्या समोर आल्या. आता महायुतीतल्या बंडखोरांचे जे काय व्हायचे ते होवो त्याबद्दलचा निर्णय एक दोन दिवसात अपेक्षित आहे.
पण त्या पलीकडे जाऊन महायुतीतल्या बंडाचा आणि त्या आधीच्या काँग्रेसी सरकारांमधल्या बंडांचा जरा तुलनात्मक विचार केला, तर महायुतीतले बंड आणि त्याच्या बातम्या फारच मिळमिळीत आणि थंड वाटाव्यात अशाच आहेत. त्या तुलनेत काँग्रेसी बंडाच्या बातम्या नेहमीच माध्यमांमध्ये “हॉट टॉपिक” राहिल्या होत्या. किंबहुना काँग्रेस मधली बंड ही नेहमीच “दिल्ली प्रेरित” असायची आणि त्यामुळेच ती नेहमी यशस्वी व्हायची!!
काँग्रेसी यशस्वी बंडांची याची असंख्य उदाहरणे देशातल्या सर्व राज्यांमध्ये सापडतील. कारण 1970 ते 80 च्या दशकात सर्वत्र काँग्रेसच सत्तेवर होती. त्यावेळी काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातल्या बंडाच्या बातम्या फार गरमागरम असायच्या. त्या मुख्यमंत्र्यांचा राजकीय बळी घेऊनच थांबायचा. त्या तुलनेत छगन भुजबळ असोत, की सुधीर मुनगंटीवार असोत, की विजय शिवतारे असोत, हे नेते मंत्रीपद मिळाले नाही म्हणून अस्वस्थ असले, तरी त्यांची बंडे पेल्यातल्या वादळा इतकीच महत्त्वाची आहेत. फारतर पेल्यातून बाहेर सांडण्याइतपत महत्त्वाची आहेत, पण यापैकी कोणीही आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान देण्याच्या क्षमतेचे नाहीत आणि तसे त्यांनी आव्हानही दिलेले नाही.
– काँग्रेसी मुख्यमंत्र्यांविरोधात बंडे
त्या उलट काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंड करून थेट दिल्ली दरबार गाठणारे काँग्रेसचे बंडखोर नेते राज्यांचे मुख्यमंत्री बदलूनच परत यायचे. यात महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर वसंतराव नाईक विरुद्ध शंकरराव चव्हाण, शरद पवार विरुद्ध विलासराव देशमुख + सुशीलकुमार शिंदे, शरद पवार विरुद्ध सुधाकरराव नाईक ही बंडे दिल्लीच्या आशीर्वादाने यशस्वी ठरली होती. 1975 मध्ये दिल्लीतून प्रेरणा घेऊन शंकराव चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्याविरुद्ध बंड केल्यानंतर इंदिरा गांधींनी शंकररावांनाच मुख्यमंत्री केले होते. त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा सल्ला देखील घेतला नव्हता. 1980 च्या दशकात तर साधारण दीड – दोन वर्षाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणे हा “दिल्ली प्रेरित” बंडखोरांचा यशस्वी हातखंडा होता. त्यामुळेच त्या काळात महाराष्ट्राला वसंतदादा पाटील, अब्दुल रहमान अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील निलंगेकर वगैरे मुख्यमंत्री मिळाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यासाठी प्रणव मुखर्जी मुंबईत आले असता त्यांनी महाराष्ट्रातल्या हर्षवर्धन पाटील आणि उल्हास पवार या नेत्यांना कडक शब्दांमध्ये सुनावले होते. मी राजकीय कारकीर्दीत आतापर्यंत 33 मुख्यमंत्री बदललेत, हा 34 वा आहे. यापुढे तुम्हाला काही बोलायचे असेल, तर बोला, असे प्रणव मुखर्जी यांनी सुनावल्यानंतर हर्षवर्धन आणि उल्हासदादा गप्प होऊन बाहेर पडले होते.
आज भुजबळांसकट बाकी कुठल्याही नेत्यांनी मुख्यमंत्री बदला, दोन उपमुख्यमंत्री बदला असल्या कुठल्याही मागण्या करून बंड केलेले नाही. तशी त्यांची क्षमता देखील नाही. त्यांना फक्त स्वतःला मंत्रीपद हवे आहे. मुख्यमंत्री देतील, ते मंत्रीपद त्यांना मान्य असेल, पण त्यांना मंत्रीपद पाहिजे आहे म्हणूनच फक्त भुजबळांसकट सगळ्यांनी बंडाचे झेंडे उभारले आहेत, ते दिले नाही तर फार काही घडण्याची शक्यता नाही. चार “समजुतीच्या गोष्टी” सांगितल्यानंतर किंवा एखादे राज्यपाल पद गळ्यात घातल्यानंतर हे बंडाचे झेंडे खाली उतरतील. म्हणूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे महायुतीतल्या बंडाच्या बातम्या फारच “थंड” आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App