विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा रंगत आहेत. महाविकास आघाडीतून वेगळे पडलेल्या मुद्द्यांना आज पुन्हा नवी दिशा मिळू लागली आहे. काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना मनसेची साथ सोडून पुन्हा काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसला विश्वासात न घेता मनसेसोबत संपर्क वाढवल्याने काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्याप पूर्णपणे निवळलेली नाही. त्यामुळेच काँग्रेसने एकला चलो रेची तयारी सुरू केली होती. मात्र आता पुन्हा उद्धव ठाकरेंशी संवादाचे दरवाजे उघडण्याची तयारी दिसत आहे.Uddhav Thackeray
काँग्रेसने आधीच मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. तरीही सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे जर मनसेसोबतची जाण्याची शक्यता संपुष्टात आणून काँग्रेससोबत आले, तर काँग्रेस स्वबळाबाबत पुनर्विचार करू शकते. मात्र त्यासाठी काही ठोस शर्तींची अट काँग्रेस ठेवू शकते, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, मनसे या चर्चेने अजिबात विचलित झालेली नाही, असे दिसते. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. आमचे निर्णय राज ठाकरे घेतील. इतर कोण काय म्हणतात याचा आमच्याशी संबंध नाही.Uddhav Thackeray
शरद पवार स्वतः पुढे आल्याची माहिती
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची फूट टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः पुढे आल्याची माहिती मिळते. पवारांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवर चर्चा केली असून, मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीचे सर्व घटक एकत्र लढावेत अशी त्यांची इच्छा असल्याची माहिती राष्ट्रवादी सूत्रांनी दिली. मतदार यादीतील घोळ आणि मतचोरीच्या मुद्द्यांवर सर्व पक्ष एकत्र आंदोलन करत असताना, निवडणुकीदरम्यान वेगळे लढल्यास त्याचा संदेश चुकीचा जाईल, असे पवारांचे मत असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेस फक्त समविचारी पक्षांसोबतच निवडणूक लढवेल – वर्षा गायकवाड
मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याबाबत शरद पवार सकारात्मक आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. महापालिकेत भाजपविरोधात मजबूत लढा देण्यासाठी सर्व शक्य पर्याय खुले ठेवण्याची भूमिका पवारांनी घेतल्याचे दिसते. मात्र याच मुद्द्यावर काँग्रेसचा विरोध कायम आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस फक्त समविचारी पक्षांसोबतच निवडणूक लढवेल. मनसेसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, रिपब्लिकन पक्षातील अनेक गट देखील काँग्रेससोबत येण्यासाठी तयार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे
मुंबई महापालिकेसंदर्भात काँग्रेस सोमवारी किंवा मंगळवारी महत्त्वाची बैठक घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर काँग्रेस आतल्या बैठकीत निर्णय घेऊ शकते. उद्धव ठाकरे मनसेसोबतची चर्चा पुढे नेत राहतील का, की काँग्रेसच्या नव्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देतील, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही राज्यातल्या आगामी राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरणार असल्याने पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App