काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

Suresh Kalmadi

नाशिक : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरचा कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ठपका त्यांच्या वयाच्या 81 व्या वर्षी दूर झाला. कलमाडी भ्रष्टाचाराच्या आरोपातून निष्कलंक बाहेर आले. शरद पवारांच्या एके काळच्या राजकीय शिष्याने भ्रष्टाचाराच्या आरोपातून “निष्कलंक” बाहेर येण्याची किमया साधली, पण त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या राजकीय अथवा अन्य कुठल्या कर्तृत्वाचा किती भाग होता, हा संशोधनाचा विषय ठरावा.Congress expecting Suresh Kalmadi’s come back, but it’s hardly possible

कारण कलमाडी गेल्या बऱ्याच वर्षांपासून राजकीय दृष्ट्या निष्क्रिय होते. विशेषतः 2014 पासून पुण्यात भाजपने भक्कमपणे हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर कलमाडींचे राजकीय अस्तित्व टप्प्याटप्प्याने मिटत गेले. साधारण सहा आठ महिन्यांपूर्वी ते जेव्हा त्यांच्या वैयक्तिक कामासाठी पुणे महापालिकेत आले तेव्हा अचानक पुणेकरांना आणि राजकीय दृष्टीने जागरूक असलेल्या महाराष्ट्रातील इतर लोकांना सुरेश कलमाडी नामक राजकीय नेते “अचानक” आठवले. तोपर्यंत कलमाडींचा बहुतेक सगळ्यांना विसर पडला होता. पण पुणे महापालिकेतला कलमाडींचा हातात काठी घेतलेला वृद्ध अवस्थेतला फोटो पाहून हेच का ते कलमाडी??, असा प्रश्नही अनेकांच्या मनात चमकून गेला होता.



कारण एकेकाळी सुरेश कलमाडी या नावाने पुण्याच्या राजकीय क्षेत्रावर अक्षरशः गारुड केले होते. सुरेश कलमाडी तीन वेळा पुण्याचे खासदार आणि एकदा केंद्रीय मंत्री होते. पुणे महापालिकेवर त्यांची अनिर्बंध सत्ता होती. शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्रित ताकदीपुढे देखील पुणे शहरात कलमाडींची ताकद अधिक होती. कलमाडी बोले आणि पुण्याची काँग्रेस हले अशी किमान 15 ते 20 वर्ष अवस्था होती. 1998 च्या निवडणुकीमध्ये सुरेश कलमाडींना शरद पवारांचे उमेदवार विठ्ठल तुपे यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते, पण म्हणून कलमाडी पुण्याच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले नव्हते‌. उलट ते 1999 च्या निवडणुकीत “बाउन्स बॅक” करून परत आले. त्यावेळचा प्रभावी विरोधी पक्ष भाजप मधला लोकसभेचा उमेदवार प्रमोद महाजनांकडून आपल्याला हवा तो आणायची “क्षमता” कलमाडींनी दाखवली होती.

सुरेश कलमाडींनी लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याचे मतांचे गणित पक्के बसविले होते. सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मते घेतली की पुणे मतदारसंघात आपण निवडून येतो हे त्यांनी तीन वेळा दाखवून दिले होते. 2014 च्या निवडणुकीमध्ये कलमाडींचा तो आकडा फारच तोकडा ठरला आणि पुण्याचा काँग्रेस उमेदवार 3 लाख 30 हजार मतांनी पडला. कलमाडींची ही खऱ्या अर्थाने राजकीय घसरण ठरली.

त्यानंतर कलमाडी राजकीय दृष्ट्या परत उठू शकले नाहीत. काँग्रेस देखील कलमाडींच्या नेतृत्वाअभावी टप्प्याटप्प्याने एवढी निष्प्रभ होत गेली की काँग्रेसचे फक्त 12 नगरसेवक निवडून आणायची क्षमता उरली. पुण्यात आठ पैकी काँग्रेसचा एकही आमदार निवडून येईनासा झाला. म्हणूनच आता सुरेश कलमाडी यांच्यावरचा कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ठपका नाहीसा झाल्यावर पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे “चमकले”. सुरेश कलमाडींना पुन्हा “ऍक्टिव्हेट” करून काँग्रेसमध्ये जान भरता येईल असे त्यांना वाटू लागले म्हणूनच पुण्यातल्या वर्तमानपत्रांमध्ये सुरेश कलमाडींच्या कमबॅकची चर्चा सुरू झाली.

कलमाडी म्हणजे पवार नव्हेत!!

पण एवढ्या सगळ्या कालावधीत पुण्यातले अन्य काँग्रेसचे नेते काय करत होते?? रमेश बागवे यांना गृहराज्यमंत्री करून काँग्रेसने पुण्याचे नेतृत्व बहाल करून पाहिले होते. मोहन जोशी, विश्वजीत कदम आणि रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीचे प्रयोग करून झाले, यात एक-दोन नव्हे तर तब्बल 15 वर्षे निघून गेली. तरी देखील काँग्रेसला अपेक्षित संजीवनी मिळू शकली नाही. या 15 वर्षांमध्ये पुण्यातल्या सगळ्या काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन पक्षामध्ये जान का भरली नाही?? निदान तसे रेटून प्रयत्न का केले नाहीत??, हा खरा सवाल आहे. आणि याचे उत्तर जर नकारात्मक असेल, तर केवळ सुरेश कलमाडी यांच्या राजकीय पुनरागमनामुळे काँग्रेसचे हे संघटनात्मक अपयश भरून काढले जाईल असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा राजकीय बौद्धिक भ्रम आहे. कारण आता कलमाडींच्या हातात वय आणि तब्येत दोन्ही उरलेले नाही आणि प्रत्यक्षात म्हातारे झाले तरी, मी काय अजून म्हातारा झालो का??, असे विचारायला ते काही शरद पवार नाहीत!!

Congress expecting Suresh Kalmadi’s come back, but it’s hardly possible

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात