लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील म्हटल्यावर काँग्रेसवाले भडकले; पण…

नाशिक : लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार रवींद्र चव्हाण यांनी काढल्यावर काँग्रेसवाले भडकले. त्यांनी त्या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. पण विलासरावांच्या आठवणी लातूर बरोबरच सगळ्या महाराष्ट्रात राहाव्यात, यासाठी काँग्रेसवाल्यांनी काय केले??, हा सवाल मात्र त्यानिमित्ताने समोर आला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर मधल्या जाहीर सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर भाष्य केले. ते करताना त्यांनी लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असे आता वाटू लागले आहे, असे सांगितले. त्यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आणि भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, माजी मंत्री बसवराज पाटील हे हजर होते. त्यांच्या हजेरीतच रवींद्र चव्हाण यांनी लातूर मधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, अशी भाषा वापरली.

– हर्षवर्धन सपकाळ भडकले

रवींद्र चव्हाण यांच्या भाषेवरून काँग्रेसचे नेते फारच भडकले. लातूर मधून विलासराव देशमुख यांचे आठवण पुसणारा अजून निर्माण झालेला नाही. आत्तापर्यंत अनेकजण तशी इच्छा बाळगून लातूरमध्ये आले, पण लातूर मधल्या स्वाभिमानी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विलासराव देशमुखांनी लातूरला देशपातळीवर ओळख मिळवून दिली. लातूरच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. पण त्या पलीकडे जाऊन सपकाळ किंवा काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांनी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाची कुठलीच भलामण केली नाही.

– काँग्रेसवाल्यांनी केले काय??

पण मुद्दा त्याही पलीकडचा आहे. केवळ रवींद्र चव्हाण म्हणाले म्हणून लातूर मधून विलासराव देशमुखांची आठवण पुसली जाण्याची शक्यता नाही. पण विलासराव आणि काँग्रेसच्या बाकीच्या मुख्यमंत्र्यांची आठवण महाराष्ट्राला राहावी, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तरी नेमके काय केले??, हा सवाल मात्र यानिमित्ताने समोर आला. वास्तविक काँग्रेसने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेक कर्तृत्ववान मुख्यमंत्री दिले. पण यापैकी यशवंतराव चव्हाण वगळता काँग्रेसने “ब्रँड” म्हणून कुठल्याही मुख्यमंत्र्याला फारसे मोठेच होऊ दिले नाही. वास्तविक यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतराव नाईक आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर विलासराव देशमुख हे काँग्रेसचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले. वसंतदादा पाटलांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले. शंकरराव चव्हाण यांनी दोनदा मुख्यमंत्री पद भूषविले. काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांसारखे बुद्धिमान मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले, पण काँग्रेसच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांनी या कुठल्याच मुख्यमंत्र्यांची “ब्रँड” म्हणून प्रतिमा विकसित केली नाही.



– पवारांचा ब्रँड

त्या उलट महाराष्ट्रात “ब्रँड” म्हणून प्रतिमा विकसित झाली, ती बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची. वास्तविक शरद पवार स्वबळावर कधीच मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. ते जुगाडू मुख्यमंत्री म्हणून आणि काँग्रेसचेच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर राज्य करू शकले. पवारांनी स्वतःच्या पक्षाचा सावता सुभा ज्यावेळी मांडला, त्यावेळी कधीच पवारांना स्वबळावर मुख्यमंत्रीपद मिळवता आले नाही. परंतु, त्यांच्या समर्थकांनी पवारांची प्रतिमा महाराष्ट्रातला मोठा राजकीय ब्रँड म्हणून विकसित केली. मग भले ती अर्धवट “ब्रँड” का असेना, पण पवारांची “ब्रँड” म्हणून प्रतिमा विकसित झाली, ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही.

– बाळासाहेबांचा ब्रँड

त्यांच्याही आधी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा “ब्रँड” म्हणून विकसित केली‌. वास्तविक शिवसेनेला महाराष्ट्रातील सत्ता फार उशिरा मिळाली. पण शिवसेना सत्तेवर येण्यापूर्वीच बाळासाहेबांचा “ब्रँड” मुंबईत विकसित झाला होता. महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर आल्यानंतर तो “ब्रँड” आणखी विस्तारला. बाळासाहेबांच्या विचाराच्या अनेक नेत्यांनी अनेक पक्षांची निर्मिती केल्यानंतर सुद्धा बाळासाहेबांची “ब्रँड’ ही प्रतिमा पुसू शकली नाही किंवा ती विरली देखील नाही. उलट महाराष्ट्रात तरी भाजपकडे स्वतःचा फार मोठा “ब्रँड” नसल्याने बाळासाहेबांचा “ब्रँड” वापरून भाजपला राजकारण साधावे लागले.

– काँग्रेसवाल्यांनी का नाही विकसित केला “ब्रँड”??

पण काँग्रेसकडे तशी अवस्था नसताना सुद्धा काँग्रेसला स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचा कुठला “ब्रँड” विकसित करता आला नाही. काँग्रेसच्या दिल्लीत बसलेल्या श्रेष्ठींना ते चालले नसते. त्यांना ब्रँड वाल्या मुख्यमंत्र्याचे कायम आव्हान वाटत राहिले असते म्हणून काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्रात कुठल्याच मुख्यमंत्र्यांचा “ब्रँड” विकसित होऊ दिला नाही.

– काँग्रेसवाल्यांचाच हातभार

वास्तविक पवारांसारखा “ब्रँड” विकसित होताना त्याला अटकाव करणे हे काँग्रेसवाल्यांचे खरे काम होते, पण काँग्रेसवाल्यांनी ते वेळीच केले नाही. उलट वेगवेगळ्या काळात ते पवारांच्या कच्छपी लागत राहिले. त्यामुळे पवारांचा “ब्रँड” विकसित व्हायला काँग्रेसवाल्यांचाच हातभार लागला. काँग्रेसवाल्यांनी पवारांचा “ब्रँड” विकसित करायला हातभार लावण्याच्या ऐवजी स्वतःच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांचा “ब्रँड” विकसित केला असता, तर हर्षवर्धन सपकाळांना रवींद्र चव्हाणांवर पोकळ भडकायची वेळ आली नसती. उलट काँग्रेसच्या “ब्रँड” मुख्यमंत्र्यांची नावे घेऊन त्यांना रवींद्र चव्हाणांचे तोंड गप्प करता आले असते.

Congress didn’t make a brand of any of it’s chief minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात