विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या तपोवणातील वृक्षतोडीला विरोध दर्शवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक तपोवनात वृक्षतोड व्हावी असे आमच्यापैकी कुणाचेही मत नाही. या प्रकरणी अधिकाधिक झाडे वाचवण्याचे प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी पर्यावरण व कुंभमेळा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे ते म्हणालेत.CM Fadnavis
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले होते. यामुळे तपोवनातील वृक्षतोडीचे कथित समर्थन करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांची पर्यायाने भाजपची अडचण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणी त्यांनी पर्यावरणही महत्त्वाचे आहे आणि कुंभमेळाही महत्त्वाचा आहे, असे सांगत या दोन्ही गोष्टींवर योग्य तो तोडगा काढण्याची ग्वाही दिली आहे.CM Fadnavis
पर्यावरण व कुंभमेळा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुंभमेळा आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. त्याचवेळी पर्यावरणही महत्त्वाचे आहेत. झाडेही महत्त्वाची आहेत. मी असेन, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, आमच्यापैकी कुणाचेही मत नाही की अशा पद्धतीने झाडे तोडली गेली पाहिजेत. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो, तिथे 15 हजार हेक्टर जागा आहे. आणि आपला कुंभमेळा ज्या साधूग्रामला शतकानुशतकांपासून होत आहे, तिथे केवळ 300 ते 350 एकर जागा आहे.
आपण 2015 – 2016 चा गुगल मॅप बघितला तर यापैकी एकही झाड आपल्याला दिसत नाही. ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घेतला, त्यावेळी नाशिक महापालिकेने विचार करून ही झाडे लावली. कारण, ती रिकामी जागा होती. 12 वर्षांत एकदाच आपण ती जागा वापरतो. आत्ता ज्यावेळी त्या ठिकाणी साधूग्राम तयार करण्याचा विचार झाला तेव्हा तिथे झाडे दिसून आली. घनदाट झाडांमुळे तिथे साधूग्राम तयार करता येत नाही. त्यामुळे आत्ता हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी योग्य तो मार्ग काढून कमीत कमी झाडे कापण्याचा किंवा कापूच नयेत अथवा दुसरीकडे लावण्याचा, अधिकाधिक झाडे वाचवावीत, अजून काही पर्याय आहेत का? या सगळ्या गोष्टींचा विचार केला जात आहे, असे ते म्हणालेत.
बोगस पर्यावरणवाद्यांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी या प्रकरणी विनाकारण राजकारण करणाऱ्यांचाही समाचार घेतला. या प्रकरणी काही लोकांनी विनाकारण अॅक्टिव्हिझम सुरू केले आहे. काही लोकं पर्यावरणवादी बनले आहेत. मला पर्यावरणवाद्यांचा आदर आहे. पण काही लोकं राजकीय कारणांनी पर्यावरणवादी बनलेत. त्यांना माझे एवढेच म्हणणे आहे की, कुंभमेळा हा निसर्गाशीच साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचे एक प्रतिक आहे. त्यामु्ळे यातून आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की, ज्यातून पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. पण काही लोकांना कुंभमेळ्यात अडथळेच यावेत असे वाटते. अशा लोकांना सांगतो की, सरकार अडथळे येऊ देणार नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
आत्ता पाहू काय म्हणाले होते अजित पवार?
तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असे अजित पवार यांनी या वादावर भाष्य करताना म्हणाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या वृक्षतोडीसाठी जोर दिला जात असताना अजित पवारांनी ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App