विशेष प्रतिनिधी
नागपूर : CM Devendra Fadnavis संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या ‘दिल्लीवारीच्या’ चर्चांना मिश्किल उत्तर दिले. यासोबतच राज्यातील पावसाची स्थिती, ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी, बोगस सोयाबीन बियाणे, नागपुरातील ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आणि मोशी इमारत दुर्घटना अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली.CM Devendra Fadnavis
‘मी परवाच दिल्लीला गेलो होतो…’; फडणवीसांचा विरोधकांना टोला
गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी “फडणवीसांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाईल आणि त्यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील,” असा दावा केला होता. आमदार आदित्य ठाकरे यांनीही हे फडणवीसांचे शेवटचे अधिवेशन असल्याचे भाकीत वर्तवले होते. या वेगवान चर्चांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी थेट विचारले की, “तुम्ही देशाचे नेतृत्व करणार, दिल्लीला जाणार का?” यावर गालातल्या गालात हसत फडणवीस यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिले, “मी परवाच गेलो होतो दिल्लीला.” या एका वाक्यात त्यांनी थेट उत्तर देणे टाळत विरोधकांच्या चर्चांना बगल दिली.CM Devendra Fadnavis
ऐतिहासिक कर्जमाफी, शरद पवारांचे मानले आभार
अधिवेशनात जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. यापूर्वीच्या ‘महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेत’ ज्यांना माफी मिळाली होती, पण जे आता पुन्हा थकबाकीदार झाले आहेत, त्यांना सुरुवातीला 50 हजार रुपयांचा दिलासा देण्याचा विचार होता. मात्र, सत्ताधारी आमदारांच्या आग्रहास्तव 50 हजारांची अट रद्द करून सरसकट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कौतुक केले होते. त्यावर बोलताना, “मी त्यांचे आभार ऐकले नाहीत, पण त्यांनी कौतुक केले असेल तर मी त्यांचा आभारी आहे,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
बोगस सोयाबीन बियाणांवर थेट फौजदारी कारवाई
विदर्भासह राज्यात बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारींवर सरकारने कठोर पावले उचलली आहेत. फडणवीस यांनी सांगितले की, कमी उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांवर तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे. तब्बल 5 हजार नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्यापैकी 300 नमुने फेल ठरले आहेत. दोषी कंपन्यांवर केवळ परवाने रद्द करण्याचीच नव्हे, तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंतची कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाची ओढ आणि शेतकऱ्यांना सल्ला
राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. “विदर्भामध्ये 10 दिवसांचा ‘ड्राय स्पेल’ आला असून पावसाची 19% तूट आहे. ‘अल निनो’ संकटामुळे पावसात तूट आणि दोन पावसांच्या स्पेलमध्ये अंतर राहणार आहे, हे आम्ही आधीच सांगितले होते.” शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानुसार सुरुवातीची धूळपेरणी टाळून उशिरा पेरण्या केल्या, ही चांगली बाब आहे. आता विहिरी आणि इतर सिंचन व्यवस्थांचा वापर करून ‘प्रोटेक्टिव्ह इरिगेशन’ दिल्यास पिके वाचवता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपुरात देशातील सर्वात मोठे ‘ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर’
नागपुरातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महाराष्ट्र शासनाच्या वतीने देशातील अत्यंत आधुनिक असे ‘ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर’ उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. हे देशातील सर्वात मोठे ‘कॉलम फ्री’ हॉल असलेले कन्व्हेन्शन सेंटर असेल. येथे शेतकऱ्यांची प्रदर्शने, कृषी परिषदा आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील.
मोशी दुर्घटना आणि एटीएसची (ATS) मोठी कारवाई
पुण्यातील मोशी येथे झालेल्या इमारतीच्या दुर्घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, या इमारतीचे काही मजले अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पहिली प्राथमिकता अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची आणि बचावकार्याची होती, ती आता संपत आली असून पुढील कठोर कारवाई केली जाईल.
राज्यामध्ये एटीएसने (ATS) नुकतीच एक अत्यंत मोठी कारवाई केली असून, यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी हाती लागल्या आहेत. याची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल, असेही फडणवीस यांनी शेवटी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App