विशेष प्रतिनिधी
नागपूर : Chief Minister Fadnavis गेल्या अडीच वर्षांत आमच्या सरकारने केलेली कामे गतीने पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आहे. विदर्भ व मराठवाड्याचा कायापालट करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या योजना गतीने पूर्ण केल्या जातील. विरोधी बाकावर असताना केलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारमध्ये आल्यावर पूर्णत्वास नेवू. विशेषत: विदर्भ व मराठवाड्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिली.Chief Minister Fadnavis
वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा नदीजोड हा ८८ हजार कोटींचा प्रकल्प मार्गी लावला आहे, असे सांगत ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत या योजनेतील सर्व अडचणी दूर करीत निविदा काढल्या. यात ६२ टीएमसी पाण्याची उचल केली जाईल. १० लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामुळे विदर्भातील दुष्काळी पट्ट्यात हिरवाई फुलेल. सिंचन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपेल. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ७ वर्षे लागेल. पण, ४ वर्षांनंतर लाभ मिळण्यास सुरुवात होईल. बळीराजा योजनेत विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील ११० प्रकल्पाचा समावेश आहे. २५ हजार कोटींचा खर्च यावर होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
कन्हान नदी वळण योजनेला परवानगी
मराठवाडा आणि विदर्भावर महायुतीचे सरकार विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट संकेत फडणवीसांनी दिले. ते म्हणाले की, गोसीखुर्द प्रकल्पात जल पर्यटनासोबत वन पर्यटनही होईल. नागनदी, पोहरा नदी व पिवळी नदीतून जाणारे सांडपाणी शुद्धीकरण केले जाईल. त्यासाठी १९०० कोटी केंद्राने दिले आहे. कन्हान नदी वळण योजनेला परवानगी दिली. १८७९ कोटींच्या योजनेमुळे जिल्ह्यात सिंचन वाढेल. अमरावती, भंडारा, गडचिरोली, बुलडाणा व वर्धा या पाच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली. सरकारी कोट्यामध्ये ९०० अतिरिक्त जागा दिल्या.
गडचिरोली भविष्यातील भारताची स्टील सिटी
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ५० हजार कोटींच्या स्टीलची गुंतवणूक केली. गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर येथे स्टीलवर गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. गडचिरोली भारताची स्टील सिटी म्हणून नावारूपाला येईल. समृद्धी महामार्गाशी गडचिरोली जोडत आहोत. येथील नक्षलवादाच्या समस्येशी जोरदार लढाई सुरू आहे. येत्या तीन वर्षांत गडचिरोली नक्षल्यांपासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वर्षभरात १५०० युवक पोलिस दलात भरती झाले. यातील ३३ नक्षलपीडित आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मराठवाडा वाॅटरग्रीड प्रकल्प पूर्ण करू
गाेदावरीत तुटीचे खोरे असल्याने मराठवाड्यात दुष्काळ जाणवतो. ५४ टीएमसी पाणी वेगवेगळ्या योजनांतून गोदावरी खोऱ्यात आणून त्यावर मात करणार आहोत. इस्रायलच्या कंपनीला मराठवाडा वाॅटरग्रीडचे काम देऊन आठ जिल्ह्यांच्या कामांना मंजुरी दिली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने या कामांना स्थगिती दिली. केंद्राने जलजीवन मिशनच्या अंतर्गत डीपीआर पाठवण्यास सांगितले होते. त्या वेळी केंद्राकडून पूर्ण पैसे मिळाले असते. पण, मविआने खंडित डीपीआर पाठवले. आमचे सरकार आल्यानंतर संपूर्ण डीपीआर पाठवला आहे. त्यामुळे नवीन जल जीवन मिशन पूर्ण झाल्यानंतर मराठवाडा वाॅटरग्रीड प्रकल्प पूर्ण करू असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यात ७२, ८३९ कोटींची गुंतवणूक
मराठवाड्यात नवीन सरकार आल्यावर ३४ मोठे प्रकल्प आले. ७२ हजार ८३९ कोटींची गुंतवणूक व ४० हजार रोजगारनिर्मिती व १ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली. जालन्यात मल्टी माॅडेल लाॅजिस्टिक पार्क होत आहे. अमृत स्थानक याेजनेतंर्गत मराठवाड्यातील १४ रेल्वेस्थानकांचा कायापालट होत आहे. यात ५०% राज्य व ५०% केंद्राचा निधी राहील. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर असा १४,८८६ कोटींचा ग्रीनफील्ड मार्ग करीत आहोत. पुण्यानंतर महाराष्ट्रात इंडस्ट्रियल मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर व जालना आहे, असे फडणवीस म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App