प्रतिनिधी
पुणे : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना – संभाजी ब्रिगेड मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मस्टर मंत्री म्हणून हिणवले. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस हे मस्टर मंत्री नव्हे, तर मास्टर ब्लास्टर मंत्री आहेत. ते चौकार, षटकार हाणतात आणि विकेटही काढतात, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला. Chief Minister Eknath Shinde’s challenge to Uddhav Thackeray
महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या अत्यंत लोकाभिमुख अभियानाचा पुढील टप्पा आज पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना शासन आपल्या दारी या उपक्रमाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगतानाच, या कार्यक्रमात लाभार्थी मंचावर बसतात आणि आपल्याला हवे ते लाभ घेऊन जातात हे या कार्यक्रमाचे वेगळेपण असल्याचे नमूद केले.
लोकप्रतिनिधी आणि अधिकारी एकत्र येऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी काम करत असल्याचे सांगून, आजवर दीड कोटी लाभार्थ्यांना या अभियानाच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे. या लाभार्थी लाभ माता भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद देणारा आहे, अशा शब्दांत समाधान व्यक्त केले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला. तसेच सरकारी रुग्णालयात कॅशलेस सेवा हा महत्त्वाचा निर्णय घेतला. सीआरपी महिलांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याचा मोठा दिलासा राज्यातील जनतेला मिळाला आहे.
बळीराजा संकटात येऊ नये, आला तर त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सततचा पाऊस ही बाब नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करुन त्यासाठी १५०० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. एक रुपयात पीक विमा देणाचा निर्णय घेतला असून त्याला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
साडेतीनशे कोटींचा निधी जेजुरी विकास आराखड्यासाठी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात त्यातील १०९ कोटीच्या कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. यामुळे भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांना मस्टर मंत्री म्हणणाऱ्यांना एवढच सांगायचे आहे की ते मस्टर मंत्री नव्हे तर मास्टर ब्लास्टर मंत्री आहेत, ते चौकार, षटकार मारतात आणि विकेटही काढतात, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
यासमयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार दत्तामामा भरणे, आमदार राहुल कुल, आमदार संजय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार शरद सोनवणे तसेच शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जिल्ह्यातून आलेले हजारो लाभार्थी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App