विशेष प्रतिनिधी
रायगड,दि.०५ :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे. तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळयांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, म्हणून ऐतिहासिक स्थळांचा, गावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.Chief Minister Eknath Shinde will give a fund of 10 crores to beautify the mausoleum of Narveer Tanaji Malusare
पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५४ व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसर सुशोभिकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, (ऑनलाईन), उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब, स्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या समाधीस्थळाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुशोभिकरण होणार असून यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभिकरण, समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकाम, बुरुजाचे बांधकाम, प्रसाधनगृहे, अंतर्गत रस्ते काँक्रीट गटार, कंपाउंड वॉलचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत.
उमरठच्या ऐतिहासिक भूमीत नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या समवेत कोंढाणा किल्ल्यावरील पराक्रमात लढलेल्या शेलार मामा यांची समाधी आहे. या दोन्ही शूरवीरांना अभिवादन करुन मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं’..ही घोषणा इतिहासात अजरामर झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नरवीर तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि स्वामी निष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा इतिहास कधीही विसरू शकणार नाही. राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील ३२ शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठी ५० कोटी देखील मंजूर केले आहेत. या सर्व कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्य शासनामार्फत आग्र्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. याबरोबरच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि शिरूरच्या वढू येथील समाधीस्थळाचं भव्य स्मारक उभारण्यात येत आहे.
रायगड जिल्हयातील पोलादपुर तालुका दुर्गम आणि डोंगराळ आहे. या भागातील युवकांचे रोजगारासाठीच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. हे लक्षात घेवून या भागातील पर्यटन विकासाला चालना देवून स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, शिवकालीन इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने हे ऐतिहासिक पाऊल उचलेले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ आणि परिसराचे सुशोभिकरण करताना त्यांच्या वाड्याचे देखील या निधीमधनू सुशोभिकरण करण्यात येईल असे जाहीर केले. तसेच या परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे देखील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून प्राधान्याने नूतनीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी या भागाच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार भरत गोगावले यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री उदय सामंत आणि उपस्थित मान्यवरांनी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब यांना शौर्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App