विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar पुण्याचा त्रिकुट कारभार बदलण्याची गरज असून इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट झाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार विकासकामे, कारभार आणि नागरी सुविधांचा विचार करतात. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक पुण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, मागे पवार साहेबांनी सांगितलं होतं कारभारी बदला तेव्हा कारभारी बदलला होता. आता त्रिकूट बदलण्याची वेळ आली आहे. जे स्वतःला पुण्याचे शिल्पकार समजतात त्यांना विचारा की पुण्याची समस्या का सोडवता आली नाही.२०१७ पासून आम्ही विरोधी पक्षात होतो, तर पुणे महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्या काळातील कारभार जनतेसमोर आला पाहिजे. प्रशासकांच्या काळात अपेक्षित कामे झाली नाहीत. नागरी सुविधा देण्यात अपयश आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदार वेगळ्या मुद्द्यांवर निर्णय घेतात; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती कामे झाली, कारभार कसा होता, याचा थेट विचार केला जातो.Ajit Pawar
मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना पवार म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्प मंजूर झाला होता. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला. भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे जाळे विस्तारण्याची गरज आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांचे रुंदीकरण पुण्याच्या तुलनेत अधिक झाले असल्याने तेथे फरक जाणवतो.
पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता असताना आम्ही विचारपूर्वक धोरणे आखली होती; मात्र स्थानिक नेतृत्वाने त्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही, अशी टीका पवार यांनी केली. आवश्यक तो पाठपुरावा करण्यात अपयश आल्यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. २०१७ नंतर तब्बल नऊ वर्षे महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने शहराच्या विकासावर परिणाम झाला, असेही ते म्हणाले.
नाराजी टाळण्यासाठी आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला; मात्र सध्या राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात या निवडणुका लढविण्याची वेळ आली आहे, असे सांगून पवार म्हणाले, काँग्रेससोबत सत्तेत असताना आम्ही स्थानिक पातळीवर विरोधात लढत होतो, मात्र सत्तेत एकत्र काम करायचो. सध्या परिस्थिती तशीच आहे. यापूर्वी ‘पुणे पॅटर्न’ होता आणि तेव्हा आम्ही भाजपसोबत एकत्र होतो; आजची परिस्थितीही त्याच धर्तीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेकडे निधी उपलब्ध असतानाही केवळ पाठपुरावा न केल्यामुळे पुणेकरांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्या प्रमाणात सुखसोयी मिळणे अपेक्षित होते, त्या मिळालेल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. टॉमटॉम ट्रॅफिक सर्व्हेमध्ये जगातील ५०१ शहरांपैकी वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा चौथा क्रमांक लागतो. यामागे ठोस कारणे असून भूसंपादन करून रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरच वाहतुकीची समस्या सुटू शकते, असे अजित पवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App