विशेष प्रतिनिधी
बीड : बीड लोकसभा मतदारसंघात आघाडीने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या दुरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे पाटील यांना उतरवून रंजकता आणली आहे. वंचित बहुजन आघाडीने आज अशोक हिंगे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे.
पण त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने ज्योती मेटेंचा पत्ता कट केला आहे. ज्योती मेटे बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी आधी शरद पवारांची भेट घेतली होती. परंतु, त्या भेटीनंतर पवारांनी बजरंग सोनवणे यांच्याच गळ्यात बीडची उमेदवारी घातली. त्या पाठोपाठच्या वंचितने अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी दिली त्यामुळे दोन्ही पक्षांनी मिळून ज्योती मेटेंचा पत्ता कट केला हे स्पष्ट झाले. पण अशोक हिंगे पाटील यांच्या उमेदवारीचा कुणाला फटका बसतो यावरच जय पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
ज्यावेळी महायुतीने पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली, त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा??, असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर महाविकास आघाडीने सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार जाहीर केला. ज्योती मेटे यांना महाविकास आघाडीने तिकीट दिले नाही. आता वंचित बहुजन आघाडीकडून त्यांचा विचार होऊ शकतो, वंचित आघाडीत ज्योती मेटे प्रवेश करू शकतात अशा चर्चा मतदारसंघात सुरू होत्या. परंतु, अशोक हिंगे यांच्या उमेदवारीनंतर या चर्चा आता थांबल्या आहेत.
वंचितने उमेदवारी दिलेले अशोक हिंगे पाटील सुद्धा जिल्ह्यातील मातब्बर नेते आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आता आघाडीने त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या एन्ट्रीने बीड मतदारसंघातील लढत आता अधिक अटीतटीची होणे अपेक्षित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App