नाशिक : शरद पवारांनी शिवसेनेच्या केलेल्या आमदारांच्या फोडाफोडी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा पूर्ण शपथविधी या दोन गोष्टी नागपूरच्या राजभवनाशी संबंधित आहेत. 1991 नंतर प्रथमच नागपूरच्या राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून तब्बल 36 मंत्री या विस्तारात नागपूरच्या राजभवनात शपथ घेणार आहेत. भाजप + एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आहे. या विस्तारासाठी फडणवीसांनी आपले होमटाऊन नागपूरची मुद्दामून निवड केली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार सायंकाळी 4.00 वाजता आहे, पण त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची जंगी मिरवणूक नागपूरकरांनी काढली आहे. देवेंद्र फडणवीस घासून आणि ठासून पुन्हा मुख्यमंत्री झाले. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला प्रचंड विजय मिळाला म्हणून या दोन नेत्यांची मिरवणूक नागपूरकर काढत आहेत. फडणवीस मंत्रिमंडळात नव्या – जुन्यांचा संगम करायचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यात विदर्भातल्या संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके या नव्या चेहऱ्यांचा आवर्जून समावेश केला आहे.
2024 च्या फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनात होण्यापूर्वी 1991 मध्ये असाच एक अचानक विस्तार नागपूरच्या राजभवनात झाला होता. त्यावेळेचे राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम यांना मुंबईतून खास विमानाने पाचारण करून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता, पण त्यासाठी शरद पवारांनी तत्कालीन अखंड शिवसेनेचे 18 आमदार फोडले होते. त्यापैकी 12 त्यांच्याकडे टिकले आणि 6 पुन्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निघून गेले होते. त्या 12 आमदारांपैकी 9 आमदारांना शरद पवारांनी मंत्रीपदाचे अमिष दाखवून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. शरद पवारांनी शिवसेना फोडली, त्या गोष्टीला शिवसेनेत छगन भुजबळांचे बंड असे नाव देण्यात आले होते.
शिवसेना फोडल्यानंतर, फुटीर आमदार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भीतीपोटी किंवा प्रेमापोटी परत त्यांच्याकडे जाऊ नयेत म्हणून शरद पवारांनी घाई गर्दीने हालचाली करून मुंबई ऐवजी नागपूर मध्येच शिवसेनेतल्या फुटीर आमदारांचा मंत्रीपदाचा शपथविधी उरकून घेतला होता, त्या उलट देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनात जंगी समारंभात करायचा निर्णय घेतला. यासाठी फडणवीसांना आयत्यावेळी कुठल्या पक्ष फोडावा लागला नाही. एकनाथ शिंदे हे अख्खी शिवसेना घेऊन आणि अजित पवार हे अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन भाजपच्या नेतृत्वाखालच्या महायुतीत सामील झाले.
नागपूरच्या राजभवनाने फुटीर आमदारांचा मंत्रीपदी शपथविधी ते संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार असे दोन्ही प्रकार अनुभवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App