विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आणि मनसे यांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या विरोधात भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. पण त्या आंदोलनाकडे भाजपच्याच प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसले.
महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्र येऊन ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मुंबईत सत्याचा मोर्चा काढला. मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाची मागणी केली, पण या मोर्चाला शरद पवार चालत गेले नाहीत. त्याचबरोबर काँग्रेसचे पहिल्या फळीतले नेतेही तिथे हजर राहिले नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहिणी खडसे आदी नेते सत्याच्या मोर्चात सामील झाले काँग्रेसचे देखील दुसऱ्या – तिसऱ्या फळीतलेच नेते तिथे हजर राहिले.
– अमित साटमांचे टीकास्त्र
या सत्याच्या मोर्चाच्या विरोधात भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला पराभव दिसतो आहे, हा पराभव झाल्यानंतर काय स्पष्टीकरण द्यायचे याची पूर्वतयारी म्हणजे हा सत्याचा मोर्चा आहे असे टीकास्त्र मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी सोडले.
– भाजपचे पहिल्या फळीतले नेते गैरहजर
पण भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी सत्याच्या मोर्चाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. भाजपने केलेल्या मूक आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार हे महत्त्वाचे चेहरे उपस्थित राहिले नाहीत. मूक आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ, मंगल प्रभात लोढा, आमदार योगेश सागर आदी नेत्यांनी केले. भाजपचे पहिल्या फळीतले नेते मूक आंदोलनाकडे फिरकले नाहीत. महायुतीतले घटक पक्ष शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नेते तिथे हजर राहण्याचा सवालही उपस्थित झाला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App