विनायक ढेरे
महाराष्ट्रात भाजपने संघटनात्मक बांधणी करताना संपूर्ण महाराष्ट्रावर अर्थात 48 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. हे लक्ष केंद्रित करताना भाजपने कोणत्याही विशिष्ट पक्षाचाच फक्त टार्गेट म्हणून विचार न करता संघटनात्मक पाया विस्तार आणि मतदानातल्या टक्केवारीत सर्वाधिक वाटा हे लक्ष्य निर्धारित केले आहे. महाराष्ट्रातल्या 16 लोकसभा मतदारसंघांमध्ये 9 केंद्रीय मंत्री सलग दौरे करणार आहेत. अर्थातच हे मतदारसंघ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांच्या वर्चस्वाचे असतील हे उघड आहे, पण भाजपची लोकसभा निवडणुकीची तयारी प्रामुख्याने मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि जास्तीत जास्त मतदान टक्केवारी आपल्याकडे वळवणे ही आहे. BJP targets 48 constituencies; Pawar’s target is the constituency of the Shinde group
पवारांचे नवे लक्ष्य शिंदे गट!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या नव्या राजकीय वातावरणात आपले लक्ष शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यावर केंद्रित केल्याचे दिसत आहे. शरद पवारांनी बऱ्याच दिवसांनी मुंबई बाहेर पडून आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आश्वासनांच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला हे खरे. किंबहुना आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा अपयशाचा पाढा त्यांनी वाचला हेही खरे, पण त्यापलिकडे जाऊन त्यांनी जी घोषणा केली की ते महाराष्ट्रात लवकरच काही जिल्ह्यांमध्ये जाऊन आढावा घेणार आहेत ही बाब विशेष महत्त्वाची आहे!!
शिंदे गटाला परेशान करण्याची योजना
ज्या जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार अधिक आहेत किंवा ज्यांचे वर्चस्व अधिक आहे, ते जिल्हे शरद पवारांच्या टार्गेटवर असणार आहेत. ठाण्यावर मी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे, असे त्यांनी जाहीरच केले आहे. याचा राजकीय अर्थ उघड आहे, एकनाथ शिंदे गटाला ठाकरे गट आणि शरद पवार एकत्र येऊन परेशान करणार आहेत. आणि एकनाथ शिंदे गट परेशान झाला की त्याचा परिणाम शिंदे गटाच्या ऐक्यावर होऊन त्यांचे ऐक्य डळमळीत होण्याची शक्यता आहे. याचा राजकीय लाभ उठवण्याचा पवारांचा मनसुबा आहे अर्थात शिंदे गट परेशान होऊन भाजपपासून दूर जाईल हा अर्थात हा पवारांचा होरा आणि प्रयत्न आहे. पण तो यशस्वी होईलच असे नाही. किंबहुना भाजप तो कितपत यशस्वी होऊ देतो आणि त्यावर कशी तोड काढतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाकरे गटाचीही मते खेचण्याचा मनसूबा
पण त्याचबरोबर शिंदे गटाला परेशान करण्यामागे पवारांचा आणखी एक वेगळा मनसुबा दिसतो आहे, तो म्हणजे शिंदे गटाच्या विरोधात असलेल्या शिवसैनिकांच्या मतांचा वाटा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीकडे खेचून घेणे. हा पवारांचा सुप्त मनसुबा दिसतो आहे. ठाकरे गट शिंदे गटावर तुटून पडणार हे उघड आहे. पण संघटनात्मक बळात ठाकरे गट खूपच कमकुवत असल्याने शिंदे गटा विरोधातली मते राष्ट्रवादीच्या संघटनेच्या बळावर आपल्याकडे खेचून घेणे हे शक्य होईल असा पवारांचा होरा दुसरा होरा आहे आणि म्हणूनच ते शिंदे गटाला टार्गेट करणार आहेत. पवारांच्या जुगाडू राजकारणातला हा पुढचा प्रयत्न आहे.
100 आमदारांचे होते राष्ट्रवादीचे मूळ टार्गेट
ठाकरे – पवार सरकार सत्तेवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसने 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये जिंकून येण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते. आता हे लक्ष्य एका अर्थाने दुरापास्त तर झालेच आहे, पण त्याचा जाहीर उच्चार देखील करताना कोणी दिसत नाही. ठाकरे – पवार सरकारच्या काळात जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100 आमदार निवडून आणण्याच्या लक्ष्याचा जाहीर उच्चार करत असत. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर कधीच बहुमताचा आकडा गाठू शकणार नाही हे वास्तव देखील त्यातून दिसून येत होते. पण आता नवीन परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गट टार्गेटवर घेऊन आपल्या मतांची जास्तीत जास्त बेगमी करण्याचा पवारांचा नवा प्रयोग आहे.
भाजपचे बेरजेचे राजकारण
एकीकडे भाजप सर्व विरोधी पक्षांना टार्गेटवर घेत असताना राज ठाकरे + एकनाथ शिंदे गट यांच्याबरोबर बेरजेचे राजकारण करतानाही दिसतो आहे. पण ही बेरीज केवळ हवेतली अथवा पर्सेप्शन लेव्हल वरची नाही, तर प्रत्यक्ष संघटनात्मक पातळीवर 9 केंद्रीय मंत्र्यांना सलग दौऱ्यांमध्ये उतरवणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि इथेच भाजपचे बाकीच्या पक्षांच्या तुलनेत वेगळे राजकीय वैशिष्ट्य दिसते आहे. पवारांच्या आजच्या ठाणे दौऱ्याआधी राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे सागर बंगल्यावर जाऊन भेटले आहेत. हा बेरजेच्या राजकारणातला महत्त्वाचा भाग आहे.
शरद पवार वय 82 ते 84 पुन्हा मैदानात
शरद पवार आता वयाच्या 82 व्या वर्षी पुन्हा पक्षाची बांधणी करण्यासाठी स्वतः मैदानात उतरणार. ते शिंदे गटाला राजकीय दृष्ट्या टार्गेट करणार आणि जे त्याचे फलित असेल ते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असे सर्वसाधारण गणित आहे. पण या तुलनेत भाजप कितीतरी अभिनव पद्धतीने राजकीय दृष्ट्या मैदानात उतरल्याचे दिसते आहे. तशी राजकीय तयारी पवार सोडून बाकी कोणत्या नेत्याची आहे का??, हा खरा प्रश्न आहे.
पवारांचा मास्टर स्ट्रोक अडीच वर्षात फेल!!
त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विरोधकांचे नेते म्हणून पवार कितीही ज्येष्ठ असले तरी त्यांची कामगिरी ठाकरे गट काँग्रेस यांच्यापेक्षा फारतर बरी राहील. पण या पलिकडे महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीकडे खेचून घेण्यात ते कितपत यशस्वी ठरतील??, या विषयी गंभीर शंका आहे. किंबहुना पवारांची 50 वर्षात फार मर्यादे पलीकडे जनतेची मते मिळवण्यात यशस्वी ठरले नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातल्या जनमताचा मर्यादेपलिकडे पाठिंबा मिळवण्यात पवारांना यश आलेले नाही. त्यामुळेच त्यांचा कायम भर जोडतोडीच्या जुगाडू राजकारणावर राहिला आहे. त्यांनी नुकताच महाविकास आघाडीचा केलेला “मास्टर स्ट्रोक” प्रयोग अडीच वर्षात फेल गेला आहे. आता पुढचे टार्गेट एकनाथ शिंदे गट ठेवून ते “नवीन प्रयोग” कोणता करतात हे आगामी काळात दिसणार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App