नाशिक : अंबरनाथ आणि अकोट मध्ये भाजपने अनुक्रमे काँग्रेस आणि AIMIM पक्षाशी युती केल्याने भाजप सत्तेसाठी काही करू शकतो, अशी वातावरण निर्मिती महाराष्ट्रात झाली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याची दखल घ्यायला लागली. त्यांनी ती दखल जरूर घेतली. आपल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनाच दमबाजी केली. त्यांना कारवाईची भीती दाखविली. पण प्रत्यक्षात अंबरनाथ आणि अकोट या दोन्ही शहरांमधले सत्ता समीकरण बदलले नाही. दोन्ही ठिकाणी भाजपला हवे तसेच सत्ता समीकरण बसले. शिवाय भाजपने काँग्रेस आणि AIMIM विरोधात नेसलेले सोवळे सुद्धा नाही सुटले!! ambernath
– त्याचे झाले असे :
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दम दिल्यानंतर पहिल्यांदा अकोट मधली सूत्रे हलली. भाजपचे आमदार आणि विधानसभेतले मुख्य प्रतोद रणधीर सावरकर अकोट मधली अकोट विकास आघाडी वाचवायलाच पुढे आले. त्यांनी अकोट मध्ये AIMIM पक्षाबरोबर केलेल्या युतीची भाजपच्या शिस्तीच्या चौकटीत राहून पाठराखण केली. अकोट मध्ये AIMIM पाच नगरसेवक निवडून आलेत. त्यापैकी चार नगरसेवक त्या पक्षाला सोडूनच भाजपा बरोबरच्या अकोट विकास आघाडीत सामील झाले, असा दावा रणधीर सावरकर यांनी केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चू कडू यांची प्रहार संघटना या पक्षांचे सुद्धा सगळेज्ञनगरसेवक भाजपच्या नेतृत्वाखालच्या अकोट विकास आघाडीत स्वतःहून आले. या नगरसेवकांनी त्यांच्या पक्षाची परवानगी घेतली की नाही, हा विषय त्यांचा आहे. आम्ही भाजपच्या भूमिकेवर ठाम आहोत, असेही रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले.
– सत्ता समीकरण जसेच्या तसे
त्यामुळे अकोट मध्ये जुळलेले सत्ता समीकरण जसेच्या तसे कायम राहिले. त्यात व्यक्ती म्हणून किंवा नगरसेवक म्हणून कुठलाही बदल झाला नाही. शिवाय भाजपने AIMIM पक्षाशी युती केली नाही. उलट त्यांचेच नगरसेवक आमच्याबरोबर त्यांचा पक्ष सोडून आले, असे रणधीर सावरकर यांनी सांगितल्यामुळे भाजपने AIMIM पक्षाविरुद्ध नेसलेले सोवळे कायम राहिले.
– अंबरनाथ मध्ये काँग्रेस “गायब”
दुसरीकडे अंबरनाथ मध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वेगळेच उद्योग केले. त्यांनी काँग्रेसचे सगळे बाराच्या बारा नगरसेवक भाजपमध्ये सामील करून घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथ काँग्रेस कमिटीच बरखास्त करून टाकली. 12 नगरसेवकांचे काँग्रेस मधून निलंबन करून टाकले त्यामुळे त्या 12 नगरसेवकांची बिनचूक राजकीय सोय झाली त्यांनी ताबडतोब भाजपचे कमळ हातात धरले.
त्यामुळे देखील भाजपने काँग्रेस विरोधात नेसलेले सोवळे जसेच्या तसे कायम राहिले. भाजपने काँग्रेस पक्षाशी युती केली नाही, तर त्यांचे सगळेच्या सगळे नगरसेवक भाजपमध्ये सामील करून टाकले. त्यामुळे भाजपने काँग्रेसशी युती केल्याचे बालंट टळले. शिवाय अंबरनाथ मध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला हवे असलेले सत्ता समीकरणे सुद्धा तिथे व्यवस्थित बसले. पण या सगळ्या प्रक्रियेत अंबरनाथ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हात चोळत गप्प बसावे लागले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App