शरद पवारांचे राजकारण “बॅक टू स्क्वेअर वन” आले आहे. पवारांची राजकारणातली 1978 पासूनची ओळख देशातले सर्वात “अविश्वासार्ह राजकारणी” अशी आहे. पण मधल्या अडीच – तीन वर्षांमध्ये विशेषतः महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते ठाकरे – पवार सरकार जाईपर्यंत किंबहुना त्यानंतरही सुमारे वर्षभर म्हणजे आजपर्यंत मराठी माध्यमांनी पवारांची “विश्वासार्हता” या मुद्द्यावर बरीच पाठराखण केली. त्यांची देशाच्या राजकारणातले “चाणक्य” अशी प्रतिमा उभी केली. पण आता त्यांचा प्रतिमाभंग झाला. आहे. राष्ट्रवादीने 20 जून रोजी पाळलेला “गद्दार दिन” हे त्याचे निमित्त ठरले. वास्तविक हा “गद्दार दिन” राष्ट्रवादीने शिंदे गटाविरुद्ध पाळला होता, पण या निमित्ताने शिंदे गटापेक्षा भाजपने अत्यंत चलाखीने राजकारण साधून घेतले!! BJP fractures false narrative of sharad pawar of being chanakya of maharashtra politics
20 जून हा दिवस राष्ट्रवादीने “गद्दार दिन” पाळल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चलाखीने त्याचा वापर करून पवारांचा 1978 चा गद्दारीचा सगळा इतिहासच महाराष्ट्रासमोर आणला. त्यानंतर सुरू झालेल्या पवार विरुद्ध फडणवीस या “राजकीय टेनिसमॅच”मध्ये राम नाईक यांच्यासारख्या पवारांपेक्षा ज्येष्ठ नेत्याला उतरवून भाजपने पवारांचे राजकारण “बॅक टू स्क्वेअर वन” म्हणजे “सर्वात मोठे अविश्वासार्ह राजकारणी” इथपर्यंत आणून ठेवले…!!
भाजपची ही अत्यंत “डीप रूटेड” चाल आहे. अन्यथा गेले कित्येक दिवस राजकीय दृष्ट्या अज्ञातवासात गेलेल्या राम नाईक यांनी स्वतःहून पत्रकारांना बोलवून 1978 मधल्या घटनांची माहिती दिली या घटनेची राजकीय संगती लागत नाही!!
राम नाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 1978 च्या सरकार स्थापनेबाबत पवार कसे खोटे बोलले, जनसंघाच्या उत्तमराव पाटलांना त्यांनी उपमुख्यमंत्री केले नव्हते, तर महसूल मंत्री केले होते आणि पवारांबरोबरच काँग्रेस मधून फुटलेले सुंदरराव सोळंके यांना उपमुख्यमंत्री केले होते, याची आठवण आवर्जून करून दिली. पण हे करताना राम नाईक यांनी आपण पवारांपेक्षा ज्येष्ठ आहोत, हे मुद्दाम अधोरेखित करून सांगितले. पवारांचे वय 83 आहे आणि आपले वय सध्या 89 आहे, असे सांगून पवारांचा महाराष्ट्रातल्या राजकारणातला ज्येष्ठतेचा दावाही खोडून काढला.
पवार नेहमीच आपली संसदीय कारकीर्द 50 वर्षांची आहे, असे सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकीचे नेतेही पवारांच्या ज्येष्ठतेचा डंका पिटतात. पण पवारांचे मुख्यमंत्री पद वगळता खुद्द राम नाईक यांची कारकीर्द देखील कमी नाही. ते देखील 3 वेळा आमदार आणि 5 वेळा खासदार राहिले. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राहिले आणि त्यानंतर उत्तर प्रदेशचे 5 वर्षे लोकप्रिय राज्यपाल राहिले. पण राम नाईक हे तुलनेने “लो प्रोफाइल” राजकारणी राहिले. पण म्हणून राम नाईक यांची राजकीय कारकीर्द पवारांपेक्षा कुठेही कमी आहे, असे अजिबात नव्हते.
पण पवार आणि बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र महाराष्ट्रात तेच सर्वांत ज्येष्ठ राजकारणी आहेत, असा नॅरेटिव्ह सेट करत राहिले होते. तो नॅरेटिव्ह आता नाईकांनी पवारांच्या खोटे बोलण्याच्या निमित्ताने उद्ध्वस्त केला आहे. नाईकांनी आवर्जून आपले वय 89 आणि पवारांचे 83 वय असल्याचे पत्रकारांना अधोरेखित करून सांगितले.
पवारांचा नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करणे आवश्यक
तसेही भाजपला महाराष्ट्रात आता पवारांनी सेट केलेला प्रत्येक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करण्याखेरीज राजकीय पर्याय उरलेला नाही. मग भले मोदी आणि पवार यांची “वैयक्तिक केमिस्ट्री” कितीही चांगली असो, पण त्या वैयक्तिक केमिस्ट्रीपेक्षा पलीकडे जाऊन भाजपला महाराष्ट्रातले राजकारण करणे भाग आहे. अन्यथा पवार भाजपला विधानसभा निवडणुकीत 100 च्या आत रोखण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे आणि नेमके हेच भाजपला नको आहे.
फडणवीस 100 प्लस, पवार हंड्रेड मायनस
भाजपने गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोनदा 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले. पण पवारांना ही किमया 50 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत कधीही जमली नाही, हे ठासून सांगितले. इतकेच काय पण ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार यांना स्वबळावर सत्ता आणता आली. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रात स्वबळावर कधीही सत्ता आणता आली नाही, असे खुद्द अजित पवारांचे वक्तव्य व्हिडिओमध्ये दाखवून भाजपने शरद पवारांना त्यांच्या खऱ्या राजकीय मर्यादेची जाणीव करून दिली!!
पवारांचा नॅरेटिव्ह उद्ध्वस्त
… आणि देवेंद्र फडणवीस यांनी 1978 चा विषय काढला. 1978 मध्ये पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार कसे बनवले?, त्यात जनसंघाला कसे सामील करून घेतले?, याची कहाणी सांगितली. पवारांनी लगेच फडणवीसांची “प्राथमिक शाळा” काढली. जेव्हा देवेंद्र फडणवीस प्राथमिक शाळेत होते, त्यावेळी आपण सरकार बनवून जनसंघाच्या उत्तमराव पाटलांना उपमुख्यमंत्री केले होते, असे पवार खोटे बोलले. या खोट्याचेच वाभाडे राम नाईक यांच्यासारख्या पवारांपेक्षा ज्येष्ठ नेत्याने काढले. राम नाईक हे आता राजकीय दृष्ट्या रिटायर झालेले नेते आहेत. पण त्यांना भाजपने पुन्हा एकदा मैदानात आणून पवारांच्या खोटे बोलण्याचा आणि ज्येष्ठतेचा नॅरिटीव्ह देखील उद्ध्वस्त केला आहे, हेच आत्ताच्या भाजपच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App