अजितदादांच्या पुणे जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा तडाखा; म्हणून शरद पवारांचा पक्ष अजितदादांना लागला फोडावा!!

नाशिक : एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात भाजपने स्वबळाचा असा काही तडाखा दिलाय, की त्यामुळे अजितदादांना शरद पवारांचा पक्ष फोडावा लागला. उमेदवार आयात करावे लागले आणि आपल्या पारंपरिक विरोधकांशी तडजोड करावी लागली. BJP

– अजितदादांना आवाजही टाकता नाही आला

एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातल्या स्थानिक पातळीवरच्या संघर्षात खरा फटका तर अजित पवार आणि शरद पवारांनाच बसला. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे जाऊन आवाज तरी टाकला, पण अजितदादांना भाजपवर तो आवाज सुद्धा टाकता आला नाही. भाजपचे स्वबळ अजितदादांना मुकाट्याने सहन करावे लागले. भाजपचा स्वबळाचा मुकाबला करताना अजितदादांना शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडावा लागला. पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत अजित पवारांना आपल्या पारंपरिक विरोधकांशी हातमिळवणी करावी लागली. त्यांच्यासाठी सन्मानजनक जागा सोडाव्या लागल्या. हे सगळे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर घडले.

– एकेकाळी अजितदादांची “दादागिरी”

एकेकाळी शरद पवार आणि अजित पवार यांच्या अखंड राष्ट्रवादीत नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांच्या रांगा लागत असत अजितदादा “दादागिरी” करून याला बसव, त्याला बसव, असे करत असत. पण आज त्याच अजितदादांना भोर, राजगुरुनगर, इंदापूर आणि जेजुरी नगरपरिषदांच्या निवडणुकीत इतर पक्षांमधून कार्यकर्ते आणि नेते आयात करून त्यांना घड्याळ चिन्हावर उभे करावे लागले. या सर्व ठिकाणी अजितदादांना भाजप किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याशी तडजोड करून त्यांना सन्मानजनक जागा द्याव्या लागल्या. आपल्या “दादागिरीचा” प्रभाव घटल्याचे उघड्या डोळ्यांनी बघावे लागले.

– बालेकिल्ले ढासळले

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत अजितदादांना आपले परंपरागत प्रतिस्पर्धी रंजन तावरे यांच्याशी तडजोड करावी लागली. जेजुरी नगर परिषदेवर वर्चस्व गाजविणाऱ्या दिलीप बारभाई यांच्या मुलाला आपल्या पक्षात घेऊन त्याच्या संपूर्ण पॅनेलला घड्याळ चिन्हावर उभे करावे लागले. यात जेजुरीतला मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते बाजूला पडले. भोर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार असून सुद्धा त्यांच्या पक्षाला स्वबळावर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करता आले नाहीत. जुने थोपटे समर्थक रामचंद्र आचरे यांना फोडून त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घालावी लागली. भोर मध्ये नगरसेवक पदाच्या जागांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून आयात करून अनेकांना उमेदवारी द्यावी लागली.



– अजितदादा उपमुख्यमंत्री, पण फडणवीस मुख्यमंत्री

पण भाजपच्या चंद्रकांतदादा पाटलांनी भोरमध्ये जाऊन अजित पवारांच्या वर्चस्वाला जाऊन सुरुंग लावला. अजितदादा उपमुख्यमंत्री आहे पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, याची बोचणारी आणि टोचणारी आठवण चंद्रकांतदादा पाटलांनी अजितदादांना करून दिली.

खेड राजगुरुनगर नगरपंचायतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पदाचा तगडा उमेदवार मिळाला नाही म्हणून सर्वपक्षीय मान्यता असलेल्या प्रताप आहेर यांना घड्याळ चिन्हावर उभे करावे लागले. तळेगाव ढमढेरे नगरपंचायतीत भाजपला अडीच वर्षांचे नगराध्यक्ष पद देणे भाग पडले. फुरसुंगी नगरपंचायतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी तडजोड करून अजितदादांच्या राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतले म्हणून तिथे संपूर्ण पॅनेल तरी उभे राहू शकले.

– पवारांच्या घरचे वासे फिरले

एकेकाळी संपूर्ण पुणे जिल्ह्यावर शरद पवार आणि अजित पवार या काका – पुतण्यांचे एवढे मोठे राजकीय वर्चस्व होते, की त्यांनी नुसती नजर वर खाली केली, तरी नगरपालिका नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडून यायची किंवा तिथली कुठल्या गटाची सत्ता जायची. पण 2025 मध्ये ही परिस्थिती शिल्लकच उरली नाही. काका आणि पुतण्यांच्या एकतर्फी वर्चस्वाला भाजपच्या स्वबळाने असा काही तडाखा दिला की काकांचा पक्षच कुठल्या निवडणुकीत स्वतःच्या चिन्हावर उभा राहू शकला नाही. आणि पुतण्याच्या वर्चस्वाला भाजपने असा काही जमालगोटा दिला, की त्याला परंपरागत विरोधकांशी हातमिळवणी केली, तेव्हाच निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने थोडीफार वातावरण निर्मिती करता आली.

BJP brought our uncle nephew to the knees in Pune district

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात