विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांच्या भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ सिल्वर ओक वर गेले. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. Bhujbal met Pawar to hand over the sources of reservation discussion
पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या आरक्षण या विषयावरच्या चर्चेची सगळी सूत्रे पवारांच्या हातात द्यायला भुजबळांना सिल्वर ओक वर गेले होते. ते शरद पवारांशी तपशीलवार बोलले. माध्यमांना सुमारे 4 तास या विषयावर वावड्या उडवून दिल्यानंतर छगन भुजबळ माध्यमांची शरद पवारांच्या भेटीबद्दल बोलले.
छगन भुजबळ म्हणाले :
पवारसाहेबांकडे सकाळी गेलो होतो. अर्थात त्यांची काही अपॉइन्मेंट वगैरे घेतली नव्हती. फक्त ते घरी आहेत एवढं मला कळलं होतं. ते घरी झोपले होते. त्यांची तब्बेत बरी नव्हती. त्यामुळे मी थोडं थांबलो. ते उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. ते बिछान्यावरच होते. साधारण आम्ही दीड तास विविध विषयावर चर्चा केली. मी त्यांना सांगितलं मी काही राजकारण घेऊन आलेलो नाही, मंत्री म्हणून नाही, आमदार म्हणून आलेलो नाही. कुठली पक्षीय भूमिका माझी नाही.
महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही केलं आणि आता राज्यात जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक जे आहेत मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत, काही लोक ओबीसी, धनगर किंवा कोणत्याही समाजाच्या दुकानात जात नाही. अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की हे सर्व शांत झालं पाहिजे. त्यांना एक आठवण करुन दिली, बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना, मराठवाडा पेटला होता, त्यावेळी शांत करुन तुम्ही निर्णय घेतला आणि सरकारचं जे काही होईल ते होईल, याचा विचार न करत बाबासाहेबांचं नाव दिलं.
पवारांचं म्हणणं असं होतं…
आजची परिस्थितीही काहीशी तशीच आहे. तुम्ही सरकारने बोलावलेल्या बैठकीला आले नाहीत. तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला माहिती नाही, जरांगेंना मंत्री आणि मुख्यमंत्री भेटले, त्यांनी काय चर्चा केली, काय आश्वासने दिली माहिती नाही. तुम्ही अखेर ओबीसी नेत्यांची उपोषण सोडायला गेलात, त्यांना काय सांगितलं ते सुद्धा आम्हाला माहिती नाही, असं शरद पवारांनी सांगितलं.
त्यावर मी त्यांना सांगितलं हाके आणि उपोषण करणाऱ्यांना सांगितलं की उपोषण सोडा आणि चर्चा करु, त्यावर मार्ग काढू. जरांगेंना सरकारने काय सांगितलं हे मला माहिती नाही. ते तुम्ही शरद पवारांनी विचारायला हवं, मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं. तुम्ही आज राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, आणि सर्व समाजघटकांची गावागावात जिल्ह्याजिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री झालो किंवा मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळाच अभ्यास आहे असं समजायाचं कारण नाही. त्यामुळे तुम्ही यामध्ये पुढाकार घ्यायला हवं, असं मी म्हणालो.
त्यावर पवार साहेब म्हणाले, आम्ही आलो नाही कारण आम्हाला तुम्ही काय चर्चा केली हे माहितीच नाही. शिवाय ५० लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते??
यावर मी म्हणालो, तुम्ही सांगा, तुम्ही बोलवा कुणाकुणाला, आम्ही यायला तयार आहोत. त्यावर त्यांनी विचारलं कुणाची काय काय मतं आहेत ते सांगा. मग पवार साहेब म्हणाले, मी एक दोन दिवसात मी स्वत; मुख्यमंत्र्यांशी बोलतो, आम्ही काही लोक एकत्र बसतो, काय करायला पाहिजे, कसा प्रश्न सोडवता येईल यावर चर्चा करायला मी तयार आहे, असं पवार म्हणाले. मी म्हणालो, तुम्ही सांगितलं, तुम्ही बोलावलं तर सगळे मंत्री येतील, मुख्यमंत्रीही येतील.
“गोरगरिबांची घरं पेटता कामा नये”
हा प्रश्न सोडवावा, ओबीसी, मराठा समाजाचा प्रश्न सुटावा, हे तंग वातावरण शांत व्हावं हा माझा हेतू आहे. यासाठी मी कुणालाही भेटेन. राहुल गांधी असो की पंतप्रधान सर्वांना भेटायला मी तयार आहे. परंतु राज्यातील वातावरण शांत असायला हवं, गोरगरिबांची घरं पेटता कामा नये, एकमेकांच्या जीवावर उठता कामा नाही, यामध्ये कोणतंही राजकारण नाही.
त्यावर पवार म्हणाले, तुम्ही मीडियाला सांगा आम्ही यामध्ये राजकारण आणणार नाही. सामाजिक प्रश्न म्हणून याकडे बघून, काही लोकांशी चर्चा करु.
“आमची दीड तास चर्चा झाली”
आमची दीड तास चर्चा झाली. धनगर आरक्षणावरही चर्चा झाली. सर्व समाजाच्या आरक्षण प्रश्नावर चर्चा झाली. सर्व प्रश्नावर साधक बाधक चर्चा झाली. ते तयार झालेत, दोन चार लोकांना ते बोलावतील किंवा मी येतो असं ते म्हणाले. ओपनमध्ये चर्चा होणं कठीण दिसतं, त्याला राजकारणाचा वास लागतो आणि प्रश्न सुटण्याऐवजी वाढत जातो. त्यामुळे याबाबत काय करता येईल, काय पावलं उचलायला हवी हे कळून येईल.
हा राजकारणाचा विषय नाही, जे सभागृहात झालं ते सांगितलं. मला ना राजकारणाची पर्वा आहे, ना आमदारकीची, ना मंत्रिपदाची. राज्य शांत व्हायला हवं, मी कुणालाही भेटण्यास, कुणाच्याही घरी जायला, कुणालाही विनंती करायला मला कमीपणा वाटणार नाही.
मी शरद पवारांच्या भेटीला जाताना फक्त प्रफुल्ल पटेल यांना बोललो. कोणत्या विषयावर बोलणार आहे हे सांगितलं, त्यावर ते जा म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App