बौद्धविद्येचा भारतामध्ये पाया रचणारे प्रा. धर्मानंद कोसंबी यांचा भांडारकर इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल रिसर्च या जगविख्यात संस्थेशी स्थापनेपासून जवळचा संबंध आहे. प्रा. कोसंबी यांचा प्रचंड ग्रंथ संग्रह याच संस्थेकडे आहे. प्रा. पु. वि. बापट, प्रा. वा. वि. गोखले, प्रा. रं. दा. वाडेकर, प्रा. प. ल. वैद्य अशा अनेक जगन्मान्य विद्वानांनी संस्थेच्या स्थापनेपासून आपल्या संशोधनाने या बौद्धविद्येच्या कार्यात योगदान दिले आहे. अनेक विदेशी विद्वानांनी बौद्ध विद्येचा अभ्यास भांडारकर संस्थेत या विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली केला आहे. बौद्ध विद्येतील याच सातत्यपूर्ण कार्याबद्दल संस्थेला गौरविण्यात आले आहे. Bhandarkar Oriental Research Institute honored for its contribution to Buddhism
विशेष प्रतिनिधी
पुणे : बौद्ध विद्येत केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला केंद्र सरकारतर्फे सन 2019 साठीच्या वैशाख सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.बुध्द पौर्णिमेच्या शुभदिनी केंद्रीय सांस्कृृतिक व पर्यटन मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
केंद्र शासनाने स्थापन केलेल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन या संस्थेतर्फे दरवर्षी बौद्ध विद्येच्या क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती आणि संस्था यांना बुध्द पौर्णिमेच्या शुभदिनी समारंभपूर्वक वैशाख सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2015 पासून हे पुरस्कार दिले जात आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदाच्या वर्षी 26 मे रोजी बुध्द पौर्णिमेच्या दिवशी 2019, 2020 व 2021 अशा तीन वर्षांचे पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आले.
2019 चा पुरस्कार हा फक्त भांडारकर संस्थेस मिळाला. तर 2020 व 2021 या दोन वर्षांचे पुरस्कार या क्षेत्रात काम करणार्या भारत, भूतान, थायलंड, व्हिएतनाम आणि इंग्लंड या विविध देशांतील आंतरराष्ट्रीय विद्वानांना प्राप्त झाले आहेत.
भांडारकर संस्थेचे माजी मानद सचिव आणि संस्कृत व बौद्ध विद्येचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी ही माहिती दिली.भांडारकर संस्थेने स्थापनेपासूनच प्राच्यविद्या संशोधन क्षेत्रात काम केले आहे.
महाभारताची चिकित्सक आवृत्ती सुमारे 50 वर्षांच्या अथक परिश्रमाने अनेक विद्वानांच्या सहकार्याने भांडारकर संस्थेने तयार केली आहे. संस्थेची संस्कृत, पाली, प्राकृत, वेद, व्याकरण, हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म या विषयाबाबतची अनेक प्रकाशने नावाजलेली आहेत.
संस्कृतच्या स्थापनेपासूनच संस्थेकडे पाली, चिनी, तिबेटी, थाय, श्रीलंका, म्यानमार अशा विविध देशांतील वेगवेगळ्या भाषांमधील बौद्ध धर्मातील धर्मग्रंथ (त्रिपीटके) संग्रही असून इतरही अमूल्य ग्रंथसंग्रह भांडारकर संस्थेकडे असल्याचे संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी सांगितले.
भांडारकर संस्थेत बौद्ध विद्येसंदर्भात सातत्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. भविष्यातही या क्षेत्रात काम करण्याचा मनोदय संस्थेने व्यक्त केला आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी सांगितले की, या सर्व दृष्टीने विचार करुन केंद्र शासनाने भांडारकर संस्थेस हा पुरस्कार प्रदान केला आहे.
यासंदर्भात संस्थेस नुकतीच माहिती मिळाली होती व संस्थेचा सर्व तपशील केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला होता, मात्र पुरस्कारासाठी कोणतेही आवेदन पत्र पाठवण्यात आले नव्हते.
सध्या विविध विषयांवर ऑनलाईन अभ्यासक्रम संस्थेतर्फे घेण्यात येत आहेत. लवकरच श्रमण संस्कृतीपासून जैन, बौद्ध संस्कृती पर्यंतचे विविध प्रकारचे ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्याचे नियोजन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App