विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024 च्या महाविजयासाठी आपल्याला विष घ्यायचे नाही. हलाहल पचवायचे नाही. पण कडू औषध घेण्याची तयारी मात्र ठेवायची आहे, अशी स्पष्टोक्ती काकांना “मामा” बनविणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी मिशन 152 मध्ये केली. Be prepared to take bitter medicine for the great victory of 2024
महाराष्ट्र प्रदेश भाजपचा मिशन 152 नेते आणि कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग भिवंडीत झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नव्या महायुती बद्दल सविस्तर भाष्य केले. त्यांनी महाभारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातले दाखले देऊन नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपचे निर्णय समजावून सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच भाजपच्या आमदार, खासदार आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची महाबैठक भिवंडीत झाली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका नव्याने सांगितली. 2024 च्या महाविजयासाठी आपल्याला विष किंवा हलाहल पचवायचे नाही. पण कडू औषध घेण्याची तयारी मात्र ठेवायची आहे, असे फडणवीस म्हणाले.
पुराणकाळात जेव्हा समुद्रमंथन झाले, त्यावेळी समुद्रातून हलाहल आणि अमृत देखील बाहेर आले. परंतु अमृत तेव्हाच मिळणार होते, जेव्हा हलाहल विष पचवले जाईल. त्यावेळी भगवान शिव शंकरांनी ते हलाहल पचविले. त्यामुळे सर्वांना अमृत मिळाले. आता 2024 च्या निवडणुकांच्या आधी आपल्याला तसे हलाहल विष पचवायचे नाही, तर आवश्यकता भासल्यास कडू औषध घ्यायचे आहे. ते घेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. आपला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आणि पक्ष म्हणून भाजपवर विश्वास असल्याने आपण ते करून 2024 मध्ये महाविजय मिळवू शकतो, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
https://youtu.be/mAdqvoc-Eso
त्याचवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातले उदाहरण दिले. फडणवीस म्हणाले, ज्या अफजलखानाने विजापूरहून प्रतापगडापर्यंत येताना अनेक हिंदू देवदेवतांची विटंबना केली. मंदिरे उध्वस्त केली. त्याला आपण भेटायला जात आहात याविषयी महाराजांच्या काही मावळ्यांनी शंका व्यक्त केली. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात अफजलखानाचा कोथळा बाहेर काढायचे पक्के होते. त्यामुळे त्यांनी ठामपणे त्याची भेट घेतली आणि काम केले.
त्यावेळी छत्रपतींवर त्यांच्या मावळ्यांनी विश्वास ठेवला. आज आपल्यासमोर कोणी अफजल खान नाही, हे मुद्दामून बोलावे लागेल. कारण मीडिया मी याला अफजलखान म्हटले किंवा त्याला अफजलखान म्हटले, असे रंगून दाखवेल. पण ती वस्तुस्थिती नाही. आपण फक्त आपल्या क्षमतेवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवायचा आहे. एवढ्यासाठीचे उदाहरण दिले, असा स्पष्ट खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ठाकरेंची पोहरादेवी पाशी खोटी शपथ
त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी येथे जाऊन देवी समोर त्यांनी खोटी शपथ घेतली. पण त्यावेळी त्यांनी कदाचित देवीसमोर माफी मागितली असेल, की राजकारणासाठी मला खोटं बोलावं लागतंय. त्यामुळे देवीने त्यांना माफ केले असावे, असा टोलाही फडणवीसांनी हाणला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन अमित शाह किंवा बाकी कोणत्याही नेत्याने दिले नव्हते याचा पुनरुचार फडणवीस यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App