विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या हितासाठी दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी भावनिक हाक देत मराठी सेना नामक एका संघटनेच्या प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर बंधू मिलनाची पत्रिका ठेवली. त्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस देखील ठरवून ठेवला. बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आणि दोन बंधूंचे मिलन याच्या बातम्या सगळ्या मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या, पण आज दोन्ही पक्ष गाळात गेलेल्या ठाकरे बंधूंना या सगळ्याची राजकीय किंमत कळेल का??, हा खरा सवाल यातून पुढे आला.
मोहनीश रवींद्र राऊळ यांनी बंधू मिलनाची पत्रिका शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर ठेवून ३० मार्च गुढीपाडव्याला सकाळी ११.०० वाजता इथे एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना केले.
पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे हे काही आजच केलेले पहिले आवाहन नाही. यादेखील आधी शिवसेनेच्या आणि मनसेच्या अनेक नेत्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्रीकरणाची गरज बोलून दाखवली होतीच. राज ठाकरे यांनी तसे सूचित देखील केले होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यावेळी त्यांना प्रतिसाद दिला नव्हता.
उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसारख्या विश्वासार्हता नसलेल्या नेत्याशी सत्तेसाठी युती केली, पण त्यांनी राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली नाही. पवारांशी केलेल्या युतीतून उद्धव ठाकरे यांना फक्त अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळू शकले. पण शिवसेना फुटून त्यांचे फार मोठे नुकसान देखील झाले. राज ठाकरेंची भूमिका देखील कधी भाजप बरोबर तर कधी भाजप विरोधात अशी राहिली.
आता मात्र दोन्ही ठाकरेंच्या राजकीय पक्षांची अवस्था पूर्ण गलितगात्र होऊन गेली. कारण दोघांनाही विधानसभा निवडणुकीत दारुण अपयश आले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटून त्यांच्या वाट्याला फक्त 20 आमदार आले. राज ठाकरेंच्या मनसेचा तर एकही आमदार निवडून आला नाही. दोघांच्याही पक्षांना गळती लागली, ती निराळीच!!
या पार्श्वभूमीवर मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे आवाहन मराठी सेनेने केले. मात्र दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय दृष्ट्या गलितगात्रा अवस्था झाल्यानंतर तरी सुबुद्धी सुचून ते एकत्र येतील का??, असा सवाल यानिमित्ताने समोर आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App