प्रत्येक राज्यातील किमान एक तरी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात 10 टक्के बांबू अथवा जैवभाराचा वापर बंधनकारक करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या परिपत्रकानंतर पाशा पटेल यांनी सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याचीच फलश्रुती म्हणून परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळशाबरोबर इंधन म्हणून बायोमास ब्रिकेट अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून, त्या अनुषंगाने या केंद्राच्या महानिर्मिती विभागातर्फे बांबू पुरवठ्यासाठी दोन दिवसापूर्वी निविदा काढण्यात आली आहे. Bamboo will now be used as fuel in Parli thermal power plant, tender issued by Mahanirmithi says BJP Leader Pasha Patel
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रत्येक राज्यातील किमान एक तरी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात 10 टक्के बांबू अथवा जैवभाराचा वापर बंधनकारक करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या परिपत्रकानंतर पाशा पटेल यांनी सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याचीच फलश्रुती म्हणून परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळशाबरोबर इंधन म्हणून बायोमास ब्रिकेट अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून, त्या अनुषंगाने या केंद्राच्या महानिर्मिती विभागातर्फे बांबू पुरवठ्यासाठी दोन दिवसापूर्वी निविदा काढण्यात आली आहे.
ग्लासगो येथे झालेल्या पर्यावरण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सन 2050 पर्यंत 50 टक्के कमी करण्याचा संकल्प जाहीर करत इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशाला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक बांबू आणि जैवभारावर आधारित इंधन विटांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील किमान एका औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दहा टक्के जैवभारावर आधारित इंधन विटा अथवा बांबूचा वापर बंधनकारक असल्याबाबतचे परिपत्रक जारी केले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या संकल्पनेला महाराष्ट्रात मूर्त रूप देण्यासाठी पाशा पटेल यांनी देशभर चळवळ हाती घेतली आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला. 16 जुलै 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करून औष्णिक वीज निर्मिती केंद्रात इंधन म्हणून बांबू अथवा जैवभार इंधन विटाचा वापर करण्याची विनंती केली.
गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रात जैवभार अर्थात बांबूचा वापर करण्याच्या अनुषंगाने ऑगस्ट 2021 मध्ये अभ्यास समिती गठित केली होती. इंधन म्हणून दगडी कोळशाऐवजी बांबूचा वापर पर्यावरणासाठी हितकारक ठरू शकतो, या समितीच्या प्रथमदर्शनी निष्कर्षावरून पुरेसा बांबू उपलब्ध होईपर्यंत इंधन म्हणून औष्णिक वीज निर्मिती केंद्रात दगडी कोळसाबरोबरच बांबूचा वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्र आता दगडी कोळशाबरोबरच इंधन म्हणून बांबूचा वापर करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारच्या परिपत्रकाचे पालन करण्यासाठी या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातर्फे ब्रिकेट अर्थात बांबूचे तुकडे पुरवठा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी निविदा काढण्यात आली.
चार दिवसापूर्वी लातूर येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पाशा पटेल यांच्या संपर्क कार्यालयात बांबू लागवडीसंदर्भात बैठक घेऊन उद्योजकांना मार्गदर्शन करून बॉयलरमध्ये दगडी कोळश्याऐवजी पर्यावरणपूरक बांबूचा वापर वाढवून मोदींच्या संकल्पनेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते. या बैठकीला जालन्यातील उद्योजकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना येथील अनेक कंपन्यांनी इंधन म्हणून दगडी कोळशाऐवजी टप्प्याटप्प्याने बांबूचा वापर वाढवण्याची हमी दिली असून, काहींनी प्रायोगिक तत्त्वावर बॉयलरमध्ये बांबूचा वापर सुरू केला आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या बांबूला चांगला भाव मिळावा व दगडी कोळसा जाळल्यामुळे हवेतील वाढणारे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कार्बन उत्सर्जनास जबाबदार असणाऱ्या पेट्रोलच्या जागी बांबू व इतर शेतमालापासून बनलेल्या इथिनॉलचा वापर व्हावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही विशेष प्रयत्नशिल आहेत. त्या अनुषंगाने पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर इंधन म्हणून करता यावा, यासाठी ते गाडीला फेल्क्स इंजिन बसविणे सक्तीचे करणार आहेत. या निर्णयामुळे शेतमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असून, योग्य भाव मिळणे शक्य होणार आहे.
केंद्र व राज्य शासन यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबूची लागवड करावी, असे आवाहन पाशा पटेल यांनी केले आहे. बायोमास ब्रिकेट मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी निविदा काढत शासनाने याबाबत त्वरित पाऊले उचलून केंद्र सरकारच्या सूचनेचे पालन केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासन तसेच सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App