विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनात हाणामारी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच केले. दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या जोरदार वाद झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनात घुसून जोरदार हाणामारी केली. विशेष म्हणजे विधानभवनात मला मारण्यासाठीच गुंड आणण्यात आले होते, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. विधानभवनात झालेल्या या हाणामारीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरण कडक कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली.
देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?
घडलेली घटना ही अतिशय चुकीची आहे. विधानभवनात अशा प्रकारची घटना घडणे योग्य नाही. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अंतर्गत विधानभवनाचा परिसर येतो. त्यामुळे या दोघांनीही घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच यावर कडक कारवाई करावी अशी विनंती मी त्यांना केल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
विधानभवनाच्या परिसरात लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि मारामारी करतात हे विधानभवनाला शोभणारे नाही. म्हणूनच यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केली.
नेमकं काय घडलं होतं?
आज विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना विधानभवनाच्या परिसरात आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना शिवीगाळही झाली. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. विधिमंडळात आमदार सुरक्षित नसतील तर गंभीर बाब आहे, असं ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली.
विधानसभा अध्यक्ष नेमकी काय कारवाई करणार?
दरम्यान, कार्यकर्त्यांत हाणामारी झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रकार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही कानावर घातला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनाही या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आता फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, अशी भूमिका घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
– पडळकरांची दिलगिरी
गोपीचंद पडळकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर पडळकर यांनी झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पक्ष नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात सविस्तर भूमिका मांडतो, असे पडळकर यांनी पत्रकारांना सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App