विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेने राज्य सरकारच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यातील महापालिकांमध्ये पहिला क्रमांक मिळवला असला, तरी आठ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या अद्ययावत SAP (सिस्टीम्स, ऍप्लिकेशन्स अँड प्रॉडक्ट्स) संगणक प्रणालीचा अत्यल्प वापर होत असल्याने सजग नागरिक मंचाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रणालीच्या अपुर्या वापरामुळे महापालिकेचा कारभार अधिक कार्यक्षम आणि पारदर्शी होण्याची अपेक्षा धुळीस मिळत असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
पुणे महापालिकेने २०१७ मध्ये जगप्रसिद्ध SAP संगणक प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला. या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ‘ऍटॉस ओरिजिन’ या नामांकित कंपनीची निवड करण्यात आली होती. फायनान्स आणि मटेरियल्स (भांडार) या दोन मोड्यूल्सच्या माध्यमातून ही प्रणाली महापालिकेच्या आर्थिक आणि भांडार व्यवस्थापनाला पूर्णपणे डिजिटल आणि एकात्मिक स्वरूपात आणणार होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरू झालेले हे काम १ एप्रिल २०२२ पासून कार्यान्वित झाले. मात्र, तीन वर्षांनंतरही ही प्रणाली पूर्ण क्षमतेने वापरली जात नसल्याचे उघड झाले आहे.
वेलणकर यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नवीन प्रणाली लागू झाल्यावर काही काळ जुनी आणि नवीन प्रणाली एकत्र चालवून सुधारणा करणे अपेक्षित असते. त्यानंतर जुनी प्रणाली बंद करून नवीन प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित करायला हवी. मात्र, आजही भांडार विभाग SAP प्रणालीचा वापर करत नाही, तर फायनान्स विभाग केवळ अल्प प्रमाणात याचा उपयोग करतो. विशेष म्हणजे, यंदाचे बजेट तयार करण्यासाठीही SAP ऐवजी एक्सेलचा वापर करण्यात आला, ज्यामुळे या प्रणालीची उपयुक्तता प्रश्नचिन्हांकित झाली आहे.
SAP प्रणालीचा मुख्य फायदा म्हणजे त्याची अत्याधुनिक रिपोर्टिंग यंत्रणा. यामुळे बॅलन्स शीटसारखी जटिल प्रक्रिया अवघ्या दोन दिवसांत पूर्ण होऊ शकते. मात्र, महापालिकेत या सुविधेचा वापर होत नसल्याने प्रशासकीय कामकाज जलद आणि अचूक होण्याची शक्यता दुरावत आहे. याशिवाय, प्रणालीच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याचा आरोपही वेलणकर यांनी केला आहे.
सजग नागरिक मंचाने आयुक्तांना विनंती केली आहे की, येत्या १ ऑक्टोबरपासून जुनी संगणक प्रणाली पूर्णपणे बंद करून फायनान्स आणि भांडार विभागांना SAP प्रणालीचा पूर्ण वापर करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच, या प्रणालीद्वारे उपलब्ध होणाऱ्या विविध अहवालांचा उपयोग करून कामकाज जलद, अचूक आणि एकात्मिक स्वरूपात व्हावे, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. “जनतेच्या कररूपी पैशातून झालेला आठ कोटींचा खर्च वाया जाऊ नये, यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे. पुणेकरांना आता महापालिका SAP प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर करून पारदर्शी आणि कार्यक्षम प्रशासन देईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, यासाठी प्रशासन किती गंभीर आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App