नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार “भाजपामय” होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या राजकीय गुळपीठ जमू लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले असल्याचे सकृतदर्शनी दिसले, तरी त्यांनी तो संदर्भ घेऊन हे वक्तव्य केले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव दंगलीचा संदर्भ घेऊन शरद पवार भाजपमय होत चालल्याचा आरोप केला.
भीमा कोरेगावच्या दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगाने शरद पवारांना दोन वेळा हजर राहण्याची नोटीस पाठवली. शरद पवारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र आयोगाकडे सादर करावे, असे सांगितले. परंतु, शरद पवार त्या दोन्ही वेळेला चौकशी आयोगासमोर हजर राहिले नाहीत, तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची प्रत देखील चौकशी आयोगासमोर सादर केली नाही. याचा अर्थ शरद पवार हे आता “भाजपमय” होत असल्याचे दिसून येते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या वक्तव्याला भीमा कोरेगाव दंगलीची पार्श्वभूमी असली, तरी एकूण गेल्या काही महिन्यांमध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शिजलेले राजकीय गुळपीठ, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसणे आणि त्या पाठोपाठ शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एक होऊ शकतात. सुप्रिया सुळे यांनी निर्णय घ्यायचा आहे, अशा वक्तव्याचे पिल्लू सोडणे यातून शरद पवार हे भाजपच्या दिशेने सरकल्याचे चिन्ह दिसले.
त्यामुळे भाजप मधल्या काही “पवारनिष्ठांना” किंवा अजित पवारांच्या सत्तेच्या तुकड्यात आपल्याला वाटा मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे, पण म्हणून पवार एकदम भाजपमय झाले आणि त्याचा भाजपला खूप मोठा लाभ झाला, असे समजायचे कारण नाही.
– anti midas touch
कारण मूळात काही झाले तरी ते “शरद पवार” आहेत आणि शरद पवार जिथे गेले, ज्यांच्याबरोबर त्यांनी “सोबत” केली आणि ज्यांच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला, त्या नेत्यांचे किंवा पक्षांचे पुढे काय झाले, याचा इतिहास फारसा जुना नाही. याची साक्ष शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते देऊ शकतील. त्या पलीकडे जाऊन शरद पवारांनी सत्तेच्या वळचणीला बसण्यासाठी ज्या काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाची “साटेलोटे” केले, त्या काँग्रेस पक्षाच्या संघटनेलाच फोडून त्यांनी स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस “पोसली.” राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय आणि आर्थिक भांडवलीकरण केले. हा इतिहासही फारसा जुना नाही. त्यामुळे पवारांच्या राजकीय स्पर्शाला anti midas touch हे नामाभिधान लाभले. कारण मिडास राजा ज्यावेळी एखाद्या गोष्टीला स्पर्श करायचा, त्यावेळी त्याचे सोने व्हायचे, पण पवारांनी एखाद्या गोष्टीला “राजकीय स्पर्श” केला की त्याची कशी माती होते, हे सांगण्यासाठी फार मोठ्या rocket science चा अभ्यास करायची जरुरत नाही.
त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार “भाजपमय” होत आहेत, हा इशारा दिला असला आणि त्यात तथ्य असले तरी त्यातून धोका मात्र काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी पेक्षा भाजपला आहे, हा प्रकाश आंबेडकर यांच्या इशाऱ्यातला खरा “राजकीय संदेश” आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App