नाशिक : महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्याप्रमाणे वागलेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना दोन्ही ठिकाणी घेरले, ते पाहता भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये अजितदादांच्या विरोधात प्रचंड संताप उसळला आणि त्याचे पडसाद महापालिका निवडणुकांच्या नंतर होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत उमटल्याशिवाय राहणार नाहीत, अशीच चिन्हे आज मतदानाच्या दिवशी दिसून आली. Ajitdada
– अजित पवारांनी संयम सोडला
महायुतीमध्ये सर्वच महापालिका एकत्र लढवता येणार नाहीत. त्यामुळे जरी आपण वेगवेगळे लढलो तरी एकमेकांच्या पक्षांवर आणि एकमेकांच्या नेत्यांवर टीका करायची नाही. त्याऐवजी विकासावर बोलायचे असे ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे राजकीय पथ्य व्यवस्थित पाळले. परंतु अजित पवारांनी त्या राजकीय पथ्याला हरताळ फासला. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला ते फक्त एकदाच आरोप करून थांबले नाही तर त्यांनी भाजपच्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचक शब्दांमध्ये इशारा दिल्यानंतर सुद्धा अजितदादा थांबले नव्हते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे या सगळ्या नेत्यांमध्ये अजितदादांच्या विरोधात चीड निर्माण झाली. या सगळ्या नेत्यांनी अजितदादांना सौम्य भाषेत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण अजितदादांनी आरोपांचा रेटा तसाच ठेवला.
– चंद्रकांतदादांचा इशारा
या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांच्या निकालांच्या नंतर होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी संयम बाळगला असला, तरी अजितदादांनी संयम ठेवला नाही. त्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटतीलच. आम्ही तो विषय कॅबिनेटमध्ये काढू, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. याचा अर्थच भाजपचे वरिष्ठ मंत्री अजितदादांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, हेच त्यांनी प्रत्यक्षपणे सूचित केले.
– जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये संघर्ष
त्यामुळे महापालिका निवडणुका नंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपचे दुसऱ्या फळीतले नेते आणि अजित पवार यांच्यातल्या राजकीय संघर्षाचा पुढचा अंक पाहायला मिळणार आहे. पण त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली, तर अजितदादांना भाजपचे नेते “जड” जातील, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजितदादांनी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये संयम सोडला, तर भाजपचे नेते संयम राखतीलच, याची कुठलीही गॅरंटी नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App