नाशिक : ठाकरे, पवारांसकट सगळ्या विरोधकांना फुकाची बडबड आणि कृतीत आळस या निवडणुकीत नडला हेच राजकीय वास्तव महापालिका निवडणुकांच्या निकालांमधून समोर आले. भाजपच्या नेत्यांना सत्तेचा लाभ झाला. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा लाभ करून घेतला. हे जितके खरे तितकेच हेही खरे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकट भाजपच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये प्रचंड मेहनत घेतली संघटनात्मक जाळे विणले कितीही टीका किंवा शरसंधान साधले तरी भाजपने बेरजेचे राजकारण करणे सोडले नाही पक्षांमध्ये असंतोष उफाळून आला, तरी त्याला अटकाव न करता मोकळी वाट करून दिली. पण भाजपमध्ये बाकीच्या पक्षातल्या नेत्यांना घेणे थांबविले नाही. याचा अंतिम परिणाम भाजपच्या विस्तारात झाला. त्याचा चांगला परिणाम भाजपला महापालिका निवडणुकीच्या यशामध्ये पाहायला मिळाला.
– देवेंद्र फडणवीसांचा सर्वत्र संचार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 पैकी एकही महापालिका कुठल्याही राजकीय पक्षाला “बाय” देऊन सोडली नाही. त्यांनी 29 महापालिकांच्या परीक्षेतरांवर म्हणजेच पर्यायाने संपूर्ण राज्यावर प्रचाराचे लक्ष केंद्रित केले. त्यांनी एकही महापालिकेचा प्रश्न ऑप्शनला टाकला नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांनी कमी अधिक प्रमाणात ताकद लावली स्थानिक आमदार खासदार अन्य लोकप्रतिनिधींना कामाला लावले आवश्यक तिथे सर्व प्रकारचे “बळ” पुरविले. कुठल्याही ब्रँडच्या नादी न लागता किंवा कोणालाही ब्रँड न बनवता भाजपने संघटनात्मक ताकदीच्या जोरावर निवडणूक जिंकता येते हे महापालिकांच्या निवडणुकांमधून दाखवून दिले.
– एकनाथ शिंदेंच्या मधला कष्टाळू शिवसैनिक दिसला
थोड्याफार फरकाने भाजपचेच अनुकरण एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी सुरुवातीला आपल्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रित केले हे खरे पण त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांनी सगळ्या महाराष्ट्रात हिंडून शिवसेनेचा जोरदार प्रचार केला शिवसेनेच्या मूळ ताकदीचा वापर एकनाथ शिंदे यांनी अत्यंत चतुराईने करून घेतला. त्यासाठी त्यांनी कुठलीही आक्रस्ताळी भाषा वापरली नाही, भाजपच्या किंवा बाकीच्या विरोधकांच्या नेत्यांवर अनावश्यक टीकास्त्र सोडले नाही. ठाकरे बंधूंना जेवढे ठोकायचे तेवढे त्यांनी ठोकून घेतले पण त्यापलीकडे ते ठाकरे बंधूंच्याही फारसे नादी लागले नाहीत. उलट एकनाथ शिंदे यांनी शांतपणे प्रचाराचे रणनीती आखून सर्वत्र संचार केला. त्यांनी अनेक शहरांमध्ये जाऊन प्रचारसभा घेतल्या. त्याचा परिणाम त्यांना महापालिकांच्या निवडणुकांमध्ये व्यवस्थित दिसला भाजप खालोखाल त्यांना यश मिळवता आले.
– ठाकरे आणि काँग्रेस वजाबाकीचे राजकारण
या सगळ्याच्या बरोबर उलट ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे त्याचबरोबर काँग्रेसचे नेते वागले. एकीत आपली ताकद आहे हे त्यांनी लक्षातच घेतले नाही. म्हणून मुंबईत ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांनी बेरजेचे राजकारण करण्याऐवजी वजाबाकीचे राजकारण केले. या वजाबाकीच्या राजकारणाचा फटका दोघांनाही बसला मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा गणिताच्या परीक्षेला बसण्याची पात्रताच नव्हती. त्यामुळे त्यांनी कुठलेही राजकारण केलेच नाही त्यांनी फक्त ठाकरे बंधूंच्या वळचणीला जाऊन बसणे पसंत केले. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचा कुठला परिणाम ठाकरे बंधूंवर झाला नाही किंवा ठाकरे बंधूंचा परिणाम पवारांच्या राष्ट्रवादीवर झाला नाही.
– अजितदादांची दादागिरी फोल
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मात्र पवारांनी फार जोर लावायचा प्रयत्न केला. किंबहुना राज्याचे उपमुख्यमंत्री पद भोगणाऱ्या अजित पवारांनी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड वर लक्ष केंद्रित केले. पण तिथे सुद्धा भाजपच्या प्रचंड शक्ती पुढे अजितदादांची दादागिरी फोल ठरली. पवार नावाच्या ब्रँडची पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी पुरती वाजवली. पवार काका पुतणे एकत्र येऊन सुद्धा दोन्ही शहरांमधले सत्ता काबीज करू शकले नाहीत. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा दोन्हीकडे फारसे लक्ष दिले नाही. अजित पवारांनी युतीतले राजकीय पथ्य पाळले नाही. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकार मध्ये असताना ते काँग्रेस नेत्यांच्या अंगावर जायचे. तसेच त्यांनी भाजपच्या नेत्यांवर अंगावर जायचा प्रयत्न केला, पण तो उलटून त्यांच्यावरच शेकला. याचे दुष्परिणाम त्यांना भविष्यात भोगायला लागण्याची शक्यता आहे. पण हे करताना सुद्धा भाजपचे नेते उगाच आक्रस्ताळी भाषा वापरण्याची शक्यता नाही ते अजितदादांच्या पक्षाची सुमडीत कोंबडी कापण्याची दाट शक्यता आहे.
– ठाकरे बंधूंच्या ऐक्याची नुसतीच वातावरण निर्मिती
ठाकरे बंधूंनी सुद्धा वातावरण निर्मिती फार मोठी केली. त्यासाठी त्यांना मराठी माध्यमांनी फार मोठी मदत केली, पण त्या मदतीचे चीज ठाकरे बंधू करू शकले नाहीत. कारण त्यांना मुंबई आणि ठाणे सोडून इतरत्र जावेसेस वाटले नाही ते नाशिकला येऊन गेले, पण त्यांचा परिणाम काय झाला नाही. कारण ते नाशिकला येईपर्यंत त्यांच्यातली हवा बरीचशी निघून गेली होती. ठाकरे बंधूंनी ऐक्यासाठी जेवढे प्रयत्न केले आणि जेवढी वातावरण निर्मिती केली तेवढे कष्ट जर प्रत्यक्षात जमिनी स्तरावर उतरून केले असते, तर निवडणुकीतले चित्र फार वेगळे दिसले असते. ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यानंतर मुंबई आणि ठाणे हीच आपली कार्यक्षेत्रे मानली. उर्वरित महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले. आपले कार्यक्षेत्र संकुचित करून घेतले हे फार मोठे राजकीय चूक ठाकरे बंधूंनी केली त्याचा परिणाम त्यांना महापालिका निवडणुकांमध्ये भोगायला लागला.
तुम्ही महाराष्ट्रात फिरू नका. महाराष्ट्रात जाऊ नका, फक्त मुंबई आणि ठाण्यावर लक्ष केंद्रित करा, असे कुणीही ठाकरे बंधूंना सांगितले नव्हते. ते त्यांनी स्वतःहून केले. त्यांनी ऐक्य वेळेत साधले, पण त्याचा परिणाम मात्र साधायला वेळ लावला. खरं म्हणजे ठाकरे बंधूंनी 29 पैकी 29 महापालिकांवर लक्ष केंद्रित करून सगळीकडे प्रचंड जाहीर सभा घ्यायला हव्या होत्या. बाळासाहेब ठाकरेंची ही खरी शिकवण आणि वारसा होता. बाळासाहेबांनी 1995 च्या निवडणुकीत 155 सभा घेतल्या होत्या. 1990 च्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी 100 पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. 1990 नंतरच बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर संचार केला होता. नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेब सगळ्या महाराष्ट्रात हिंडत होते. त्यांनी एकही शहर गाव किंवा तालुका आणि जिल्हा “ऑप्शनला” टाकले नव्हते.
– पवार फॅक्टर संपुष्टात
ठाकरे बंधूंकडे तर स्वतः ते दोघे आणि पुढची पिढी सुद्धा हाताशी होती. या चौघांनी मिळून सगळ्या महाराष्ट्र पिंजून काढायला हवा होता पण त्यांनी ते करण्यात आळस दाखविला. परिणामी ते मुंबई आणि ठाणे सुद्धा गमावून बसले. अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जरा जास्तच दादागिरी केली. आपण काँग्रेसबरोबर सत्तेत, तर भाजपबरोबर सत्तेत आहोत हे राजकीय सत्य ते विसरले. त्याचा परिणाम त्यांना भोगायला लागला. अजितदादांना त्यांच्या कुटुंबीयांनी साथ दिली, पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी पुरेशी साथ दिली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App