विशेष प्रतिनिधी
नाशिक : सध्या महाराष्ट्रात खुर्चीचा खेळ जोरात सुरू आहे. रिकामी खुर्ची ते मुख्यमंत्र्यांची खुर्ची, राजकीय कहाणी मॉर्फिंगवर आली!!, असे म्हणायची वेळ आली आहे. An empty chair to the Chief Minister’s chair; The political story was morphing
खुर्चीचा खेळ परवाच रिकाम्या खुर्चीवरून सुरू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच दिवसांनी मातोश्री बाहेर पडून गोरेगावातल्या नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातील व्यासपीठावर एक रिकामी खुर्ची दिसली. ती संजय राऊत यांच्या नावाची होती. संजय राऊत तुरुंगात असताना शिवसेना त्यांच्या पाठीशी कशी ठाम उभी आहे, हे त्या रिकाम्या खुर्चीने दाखवून दिले.
नंतर हा खुर्चीचा खेळ मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची पर्यंत जाऊन पोहोचला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कसे बसले आहेत आणि जनतेच्या समस्या कशा सोडवत आहेत, असा फोटो राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी शेअर केला. त्यावर अर्थातच राजकीय घमासान सुरू झाले. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांसाठी दिल्लीत लॉबिंग करण्यासाठी आघाडीवर होते. इतकेच नाही, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी शिवसेनेचे 12 खासदार उभे करून संसदीय शिवसेनेत फूट पाडली. याविषयी अनेक बातम्या आल्या आहेत. पण ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने शेअर केल्यानंतर मात्र मोठी खळबळ उडाली. त्याविषयीचे वेगवेगळे फोटो सादर करून खुलासे – प्रतिखुलासेही झाले.
आता शिवसेनेच्या शिंदे गटाने राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्या असल्याचा फोटो शेअर केला. त्यावर राष्ट्रवादीने प्रत्युत्तर देताना हा फोटो कसा मॉर्फिंग केलेला आहे आणि शीतल म्हात्रे यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे सांगत सुप्रिया सुळे यांचा वेगळा फोटो शेअर केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मुद्द्यावर शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता एकमेकांसमोर उभ्या ठाकले आहेत. संजय राऊतांच्या रिकाम्या खुर्ची पासून सुरू झालेली ही राजकीय कहाणी, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण कसे बसले इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. आता एकमेकांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारी झाल्यानंतर खुर्चीची ही कहाणी कशी वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App