विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ambadas Danve शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यानिमित्ताने आज विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडला. निरोपाच्या भाषणावेळी त्यांनी संघातील सुरुवात, शिवसेनेतील वाटचाल आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले नातेसंबंध सांगत आठवणींना उजाळा दिला. तसेच “मी पुन्हा येईन” आणि ” मी मार खाऊन घरी परतरणारा नाही” असे म्हणत लढण्याचा निर्धारही व्यक्त केला.Ambadas Danve
अंबादास दानवे ( Ambadas Danve ) ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून आले होते. 44 दिवसांनंतर त्यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपणार आहे. त्यानिमित्ताने आज त्यांचा निरोप समारंभ पार पडला.Ambadas Danve
नेमके काय म्हणाले अंबादास दानवे?
दहावीला असताना अशापद्धतीने निरोप समारंभ शाळेत झाला होता. त्यानंतर पहिल्यांदा असा निरोप समारंभ होत आहे. पण दहावीला निरोप समारंभ झाल्यानंतर त्याच कॉलेजला जावे लागले. देवेंद्र फडणीसांप्रमाणे मी पुन्हा येईन, त्याची चिंता करण्याची गरज नाही, अशी मिश्किल टिप्पणी अंबादास दानवेंनी केल्यानंतर सभागृहात हशा पिकला.
इथून पुढेही काम सुरू राहील
महिना दीडमहिन्यापूर्वी विरोट कोहली, रोहित शर्मा निवृत्त झाले. त्यांनी सांगितले की, आम्ही कसोटी खेळणार नाही. बाकी वन-डे आणि टी-20 खेळणार आहे. त्याचप्रमाणे मी फक्त विधान परिषदेत येणार नाही, बाकी सगळ्या मॅचेस चालू राहतील, असे अंबादास दानवे म्हणाले. मी सगळ्या पदावर आहे, पण मी आता शिवसेनेचा नेता सुद्धा झालो, हे सगळे जण विसरले. शिवसेनेत पक्षप्रमुखानंतर नेता सर्वात महत्त्वाचा असतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमुळे मला ती संधी फार कमी वयात भेटली, असेही अंबादास दानवे म्हणाले.
काश्मीर आंदोलनाची आठवण
मी मागील तीस वर्षांपासून शिवसेनेसोबत काम करतोय. त्या काळात चंद्रकांत पाटील विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्यावेळी काश्मीरचे आंदोलन चालू होते. त्यावेळी चंद्रकांत पाटलांकडे वेगळी जबाबदारी होती. देशामध्ये वेगळ्या प्रकारचे वातावरण असताना आमच्यासारखे पोर पकडले होते. काश्मीरमध्ये तिरंगा फडकावयला मुरली मनोहर जोशी श्रीनगरला गेले, त्यामध्ये मी सुद्धा होतो, याचा मला अभिमान आहे, अशी आठवण अंबादास दानवे यांनी सांगितली. मी दहाव्या वर्षांपासून संघाच्या शाखेशी संबंधित असलेलो आहे, असेही ते म्हणाले.
आर. आर. पाटलांनी तडीपारी रोखल्या
जिथे जिथे संघाने चांगले काम केले, तिथे तिथे शिवसेना रुजलेली आहे. कारण हिंदुत्वाचा विचार होता. त्यावेळेसची भाजपची विचारसणी लोकांना आक्रमक वाटायची नाही. त्याकाळात छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदूंना जगणे मुश्कील होते. बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही संघटनेचे काम केले. त्यावेळी माझ्यावर अनेक केसेस झाल्या. दोन-चार वेळा तडीपारची ऑर्डर निघाली, पण गृहमंत्री चांगले होते, त्यामुळे मला फार काही बाहेर जावे लागले नाही. हा दुसऱ्या पक्षाचा आहे आणि त्याला तडीपार केले पाहिजे, असा विचार त्यावेळचे गृहमंत्री करत नव्हते. आर. आर. पाटील यांनी आमच्या तडीपारी सहज थांबवल्या होत्या, अशी आठवणही अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितली.
काही झाले तरी शिवसेना सोडू नका–बाळासाहेबांची शिकवण
शिवसेना प्रमुखांकडे आम्हाला 2000 साली बोलावले होते. आमच्या शहराच्या शहरप्रमुख ठरवायचा होता. त्यावेळेत शिवसेना प्रमुख मुलाखत घेऊन नियुक्ती करायचे. माझी 2004 मध्ये त्यांनी मुलाखत घेऊनच नियुक्ती केलेली आहे. आमच्या शहरातील दोघांना शहर प्रमुख करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी बोलावले होते. आम्ही गेल्याबरोबर शिवसेना प्रमुखांनी आम्हाला विचारले, तुम्ही खैरेंची की रावतेंचे? आम्ही घाबरलो. आम्ही म्हणालो, आम्ही दोघांचेही नाही. आम्ही तुमचे आहोत. बाळासाहेबांनी त्यावेळेस दिलेले उत्तर आजही माझ्यावर मनावर कोरलेले आहे. बाळासाहेब ठाकरे असे म्हटले की, माझे कशासाठी राहता? उद्या मी शिवसेना सोडली तर…? मी शिवसेना सोडली, तरी तुम्ही शिवसेना सोडू नका. तुम्ही माझेही राहू नका. तुम्ही शिवसेनेचे राहा. अशापद्धतीने बाळासाहेबांनी निष्ठा रुजवलेली आहे आणि या निष्ठेने आम्ही काम करतोय, असेही अंबादास दानवे म्हणाले.
निरोपामुळे नाराज नाही
आता टर्म संपली. सध्या निरोप समारंभ आहे. याबाबत नाराजी असण्याचे कोणतेही कारण नाहीये. आम्ही कधी विचारही केला नव्हता, की आम्हाला अशाप्रकाराच्या खुर्च्या बसायला भेटणार आहे. आम्ही हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारे शिवसैनिक आहोत. त्यावेळी पोलिसांशी संघर्ष, गुंडांशी दोन हात, दंगलीमध्ये भाग घ्यावा लागला, अशा सर्व गोष्टी कराव्या लागल्या. त्यादरम्यान असे सभागृहात येऊन बसायला भेटेन, असा कोणी विचार केला होता? माझ्याकडे अजून 44 दिवस आहेत. 44 दिवसांत दुनिया इकडची तिकडे होऊ शकते, असे अंबादास दानवे म्हणाले.
विरोधीपक्ष नेत्याच्या कार्यकाळातील माहिती
विरोधीपक्ष नेता म्हणून काम करत असताना जवळपास 1 हजार 71 दिवस झालेत. या कालावधीत 431 दिवस राज्यातील 35 जिल्ह्यांचा दौरा केला असून, अडीच लाख किलोमीटरचा प्रवास केला. अजून माझ्याकडे 44 दिवस बाकी आहे. त्यामध्ये आणखी 5-10 हजार किलोमीटर सहज फिरून घेईन, असेही अंबादास दानवे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App