विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असे फूट पडली असली तरी पवार फॅमिली “सेफ गेम” खेळत असल्याचा डाव स्वतः आमदार रोहित पवारांनीच उलगडला. बारामतीत अजितदादा आणि सुप्रिया सुळे हेच निवडून येतील. दुसरे कोणी नाही. कारण तेथे पवार कुटुंबीयांमध्ये लढतच होणार नाही. पवार कुटुंबामधले कोणी कोणाविरुद्ध उभेच राहणार नाही, असा खुलासा रोहित पवारांनी केला. Ajitdada and Supriya will be selected from Baramati
रोहित पवारांच्या या खुलासामुळे राष्ट्रवादीचे काय व्हायचे ते होवो पवार कुटुंबीय एक राहतील आणि “सेफ गेम” खेळतील, हा डावच उघडकीस आला आहे.
राष्ट्रवादीतल्या फुटीचे इतर नेत्यांवर खापर
शरदनिष्ठ गटाच्या नवीन स्ट्रॅटेजीनुसार शरद पवारांच्या समर्थक नेत्यांनी विशेषतः रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील फुटीचे खापर अजित पवार सोडून इतर नेत्यांवर फोडायला सुरुवात केली. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीप कोळसे पाटील आदी नेत्यांचा त्यांनी समावेश केला. हे सगळे नेते अजित दादांना “व्हिलन” बनवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
पण त्याचवेळी बारामतीत मात्र “सेफ गेम” होईल, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले. बारामतीत पार्थ पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लोकसभेत लढत होणार नाही. कारण अजितदादा कुटुंबातल्या कोणाविरुद्ध दुसऱ्या सदस्याला उभेच करणार नाहीत. तशी भूमिका ते घेणार नाहीत आणि बारामती विधानसभा निवडणुकीत अजितदादांखेरीज दुसरा कोणीही उमेदवार निवडून येऊ शकणार नाही. पक्षाने मला तिकीट दिले तरी मी त्यांच्या विरोधात उभा राहणार नाही असा खुलासा रोहित पवारांनी केला.
पण या खुलाशामुळेच शरदनिष्ठ गटाचा राजकीय डावच उघड्यावर आला, तो म्हणजे राष्ट्रवादीतल्या अन्य नेत्यांचे काय व्हायचे ते होवो, पक्षाचे काय व्हायचे ते होवो, पवार कुटुंबीय मात्र बारामती वरचा आपला कब्जा सोडणार नाहीत. ते एकमेकांविरुद्ध लढणार नाहीत असेच रोहित पवारांच्या वक्तव्यातून समोर आले.
रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांवर शरसंधान साधताना सोशल मीडियावर काही पोस्ट टाकल्या. त्यामध्ये त्यांनी वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांना शरद पवारांनी किती आणि कोणती पदे दिली, याचा उल्लेख केला. शरद पवारांनी एवढी सत्ता पदे देऊनही या नेत्यांचे समाधान झाले नाही. शरद पवारांच्या सहवासात 40 वर्षांपेक्षा अधिक काळ राहूनही शरद पवार त्यांना ओळखता आले नाहीत, असे टीकास्त्र रोहित पवारांनी या नेत्यांवर सोडले.
या नेत्यांनी देखील रोहित पवारांना तितकेच सडेतोड प्रत्युत्तर दिले. रोहित पवारांचे जेवढे वय आहे त्यापेक्षा जास्त आमची सार्वजनिक कारकीर्द आहे, असे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवार यांना सुनावले.
राष्ट्रवादीतल्या या घामासानात रोहित पवारांनी अजित निष्ट गटाच्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे वळलेल्या तोफा आपल्याकडे वळवून घेतल्या आणि पवार कुटुंबाला “सेफ” करून घेतले. त्याचवेळी त्यांनी अजित पवार सोडून इतर नेत्यांवर शरसंधान साधत याच नेत्यांनी अजितदादांना “व्हिलन” केले, असा आरोप केला. त्यामुळे देखील राष्ट्रवादीचे काय व्हायचे ते होवो, पण पवार कुटुंबीय स्वतःसाठी मात्र “सेफ गेम” खेळत असल्याचे समोर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more