
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची उतावळी दाखवणाऱ्या अजित पवारांनी म्हणे, फडणवीस सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी काही अटी शर्ती लादल्या आहेत. तुम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आधी आटपून घ्या मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिपदांची चर्चा करू अशी अट म्हणे अजितदादांनी नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे ठेवली आहे. तशा बातम्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
पण या अटी शर्तींच्या खऱ्या बातम्या आहेत की राष्ट्रवादीच्या सूत्रांनी माध्यमांमध्ये सोडलेल्या पुड्या आहेत??, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या महाराष्ट्रभर पसरल्या त्यावर गेल्या आठ-दहा दिवस सतत चर्चा झाली, पण तरी देखील भाजपचे नेतृत्व बधले नाही. त्यांनी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राजी केले. दिल्लीतले भाजप श्रेष्ठी आणि नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नियंत्रणाखाली मंत्रिमंडळात खातेवाटप होईल, हे एकनाथ शिंदे यांच्या गळी उतरवले. त्यामुळे एकनाथ शिंदे देखील आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला राजी झाले. त्यांना महसूल नगरविकास किंवा सार्वजनिक बांधकाम ही खाती देण्याचे निश्चित झाल्याच्या बातम्या समोर आल्या.
जे भाजपचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्यासारख्या तगड्या नेत्यापुढे झुकले नाही, किंबहुना एकनाथ शिंदेंनाच आपल्या अटी शर्तींवर फडणवीस मंत्रिमंडळासाठी फडणवीस मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी राजी करून घेतले, ते भाजपचे नेतृत्व अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच्या कुठल्या अटी शर्ती मान्य करतील ही सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळेच अजितदादांनी राजभवनातल्या पत्रकार परिषदेत ‘मी तर शपथ घेणार बाबा”, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची उताविळी दाखवली होती, ते अजितदादा भाजपला कुठल्या अटी शर्ती घालण्याच्या क्षमतेचे राहिले आहेत किंवा नाही, हे पाहण्याची तसदी न घेता मराठी माध्यमांनी खुशाल अजितदादांच्या अटी शर्तींच्या बातम्यांच्या पुड्या सोडल्या. त्यासाठी मराठी माध्यमांना भाजप मधली कुठली सूत्रे सापडली नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या सूत्रांच्या हवाल्यानेच बातम्या देऊन टाकल्या. यातून त्या बातम्या नसून राजकीय पुड्या असल्याचेच उघड्यावर आले.