विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते झाला. शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीपूजन आणि मोळी टाकून गळीत हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक संगीत, शेतकऱ्यांचा उत्साह आणि कारखान्याच्या परिसरात उभा असलेला गजबजलेला माहोल यामुळे संपूर्ण परिसरात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी आणि कारखान्याच्या प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य करत राज्याच्या आर्थिक आणि कृषी धोरणांबाबत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.Ajit Pawar
कार्यक्रमावेळी अजित पवार म्हणाले की, काही साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबरपासूनच गळीत हंगाम सुरू केला आहे आणि त्यांना नोटीस देण्यात आली आहे. हे सर्वांचे सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके मोठे आर्थिक पॅकेज कधीही दिले गेले नव्हते, असे त्यांनी सांगितले. अजित पवारांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाबाबतही भाष्य करत सांगितले की, अजून चार ते पाच दिवस पाऊस राहणार आहे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात केंद्र सरकारशी सतत संवाद सुरू आहे. मदतीसाठी आम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांशी सातत्याने बोलत आहोत, असे त्यांनी सांगून शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला.Ajit Pawar
दरम्यान, अजित पवारांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंवर मिश्कील टिप्पणी करत वातावरण हलके केले. भरणे साहेब म्हणाले, मी भवानीनगरमध्ये जमीन घेतली आहे. मला वाटलं रस्ता वाढेल, पण इथे उड्डाणपूलच आला. कुठे कुठे जमिनी घेतल्यात हे आम्हाला कळलं नाही. ती दूरदृष्टी आम्हालाही द्या, असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लहर निर्माण केली. पुढे बोलताना पवार म्हणाले, सगळी सोंग करत येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. काहींनी तर पुरुष असूनही लाडक्या बहिणींचा लाभ घेतला. योजना खऱ्या पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हीच खरी काळाची गरज आहे. या वक्तव्याने त्यांनी लाभार्थी निवडीतील पारदर्शकतेचा मुद्दा अधोरेखित केला.
अजित पवारांनी आपल्या भाषणात कुटुंब नियोजन आणि भूमिहीनतेच्या प्रश्नावरही भाष्य केले. जमिनींच्या वाटण्या होत गेल्या आणि भूमिहीनता वाढत गेली. आम्ही निवडणुकीला उभं राहायचं असेल तर दोनच आपत्य असावीत असं धोरण आणलं. आम्हाला ते आणखी कडक करायचं होतं. ज्याला दोनपेक्षा जास्त अपत्यं आहेत त्याला सरकारी योजना देऊ नयेत असं आमचं ठरलं होतं, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विनोदी शैलीत, काहींनी तर आंबा खाल्ला की पोर होतं असं म्हणतात, असं सांगत उपस्थितांमध्ये हास्याचा क्षण निर्माण केला. पवारांच्या मिश्कील भाषणशैलीतून गंभीर विषय मांडण्याचा प्रयत्न दिसून आला.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं
कर्जमाफीसंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कर्जमाफीबाबतचा निर्णय आम्ही जून महिन्यात घेणार आहोत. जाहीरनाम्यात दिलं आहे म्हणून आम्ही ते पूर्ण करू, पण हे सारखं सारखं होणार नाही. यात आम्ही राजकारण करणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने आगामी महिन्यांत शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचा संदेश दिला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकरी तुम्हाला कधीही विसरणार नाही, असे भरणे म्हणाले. त्यांनी सांगितले की, राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे 2 कोटी एकरांहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले असून, त्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App