विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Laxman Hake : महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे अजित पवार यांना सातत्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणासंदर्भात अजित पवार यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून आपण फोन केला होता, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अजित पवार गटाचे नेते आणि विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी संबंधित महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या निवड प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र यूपीएससीला दिले होते. यावर टीका झाल्यानंतर त्यांनी ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
याच पार्श्वभूमीवर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या वादावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. बीडला जाण्यापूर्वी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवार आणि अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “अजित पवारांनी अमोल मिटकरीसारख्या व्यक्तीला, ज्याच्यावर कोणताही विश्वास नाही, विधानपरिषदेत पाठवून सभागृहाचा अपमान केला आहे. अमोल मिटकरीमुळे अजित पवारांना अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मिटकरी हे अजित पवार यांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम करत आहेत.”
अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यात यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत. यापूर्वी एका टीव्ही चॅनलवरील चर्चेत दोघांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावेळी हाके यांनी मिटकरींवर पुन्हा जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “अमोल मिटकरी हा मुक्त विद्यापीठातून पदवीधर झाला आहे. त्याला यूपीएससीचा पूर्ण फॉर्मसुद्धा माहीत आहे का? मिटकरी एखाद्या समाजाला लक्ष्य करतो आणि तो नकलाकार आहे.”
याचवेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “अजित पवारांनी कारखाना चालवण्याव्यतिरिक्त दुसरे काय केले आहे? त्यांना दुसरे काही जमते का? अजित पवारांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊ नये, त्यांची तेवढी लायकी नाही. त्यांनी वसंतरावांचा किंवा शरद पवारांचाही वारसा सांगू नये. अजित पवारांना पोल्ट्रीवर काम करणारा कामगारच शोभतो. त्यांनी आपली भाषा सुधारावी.”
या संदर्भात बोलताना हाके यांनी ठणकावून सांगितले की, “हा महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही.” तसेच त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे तोंडभरून कौतुक केले आणि त्यांना आव्हान दिले की, “महाराष्ट्र हा ओबीसी, 18 पगड जमाती आणि भटक्या-मुक्तांचा आहे, हे दाखवून द्या.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App