नाशिक : पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांची पूर्ती झाली “शोभा”; स्थानिक आणि किरकोळ निवडणूकांमध्ये निघाली हवा, असेच म्हणायची वेळ अजित पवार आणि रोहित पवारांच्या राजकीय अवस्थेवरून येऊन ठेपली.
अजित पवार आणि रोहित पवार यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर चढवून ठेवले, पण प्रत्यक्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या किरकोळ निवडणुकांमध्ये या दोन्ही नेत्यांची हवा निघाली. Ajit Pawar and Rohit Pawar
सहा वेळा उपमुख्यमंत्री होणाऱ्या अजित पवारांना भाजपने असे काही जखडून ठेवले, की त्यांना धड सत्तेच्या वळचणीपासून दूर होता येत नाही आणि हाती असलेल्या सत्तेचा वापर करून संपूर्ण महाराष्ट्रभर संचार करता येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली भाजपने महापालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जवळ केले, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर लोटले. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या निवडणुका एकट्याच्याच बळावर लढवायची पाळी अजित पवारांवर आली. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली असली, तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कुठलेच नेते अजित पवारांबरोबर प्रचारात दिसले नाहीत. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रचाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एकट्या अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्येच गुंतून पडावे लागले. त्या पलीकडे अन्य 26 महापालिकांकडे लक्ष द्यायला सुद्धा त्यांना वेळ शिल्लक राहिला नाही.
– दोन महापालिकांमध्येच अडकले
त्यातही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपने असे काही तगडे आव्हान उभे केले, की त्यामुळे अजित पवारांसारख्या राज्य पातळीवरच्या आणि पोस्टरवरच्या मुख्यमंत्री पदावरच्या नेत्याला भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या आव्हानांना सामोरे जावे लागले. भाजपचे स्थानिक पातळीवरचे नेते सुद्धा अक्षरशः टिंगल टवाळीच्या भाषेत त्यांची खिल्ली उडवू लागले. अजित पवारांनी जरा आक्रमक भाषा वापरली, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ हे त्यांच्या अंगावर गेले त्यामुळे अजितदादांना बॅकफूट वर जावे लागले. आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विरोधात बोलत नाही, असे म्हणावे लागले.
– महेश लांडगेंनी सुद्धा ठोकला शड्डू
पण अजितदादांना केवळ भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी आव्हान दिले असे घडले नाही, तर पिंपरी चिंचवड मध्ये एकेकाळचा त्यांचा पठ्ठ्या भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सुद्धा अजितदादांसमोर शड्डू ठोकला. आधी तुमच्या मुलाचा भ्रष्टाचार बघा. तुमचा आणि तुमच्या मुलाचा भ्रष्टाचार वाचवण्यासाठी तुम्ही भाजपकडे आलाय, हे विसरू नका अशा शब्दांत महेश लांडगे यांनी अजितदादांना ठणकावले. ते अजितदादांना ऐकून घ्यावे लागले. एरवी जुने अजितदादा असते, तर त्यांना ललकारण्याची हिंमत महेश लांडगे यांना झाली नसती. पण आता महेश लांडगे यांच्या पाठीशी भाजपचे बळकट नेतृत्व उभे आहे आणि अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेत. त्यामुळे अजितदादांना भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना सुद्धा आक्रमकपणे प्रत्युतरे देता आली नाहीत. त्यामुळे मी कोण आहे हे जनताच ठरवेल, असे किरकोळ शब्दांमध्ये अजितदादांनी महेश लांडगे यांना प्रत्युत्तर दिले.
– पूर्वीच चालायची दादागिरी
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना अजितदादा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडे दादागिरी करायचे पण भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या खोलीतल्या नेत्यांसमोर सुद्धा आता त्यांना दादागिरी करता येईल अशी झाली ही अवस्था त्यांच्यावर येऊन ठेपली.
– रोहित पवारांना दणका
त्यापलीकडे जाऊन राष्ट्रवादीचे दुसरे पोस्टर बॉय म्हणजेच पोस्टर वरचे मुख्यमंत्री रोहित पवार यांना तर महापालिका निवडणुकांपेक्षा खालच्या निवडणुकांमध्ये फटका बसला. त्यांच्या हातातून जामखेड नगरपरिषद तर निसटलीच, पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत क्रिकेटपटू आणि भाजपचा नेता केदार जाधव याने रोहित पवारांना मुंबई हायकोर्टामार्फत दणका दिला.
– मतदार यादीतील घोळ आला अंगाशी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वर पवार कुटुंबाचे वर्चस्व टिकवण्यासाठी रोहित पवारांनी स्वतःचे नातेवाईक आणि स्वतःच्या व्यवसायाशी संबंधित तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित लोक मतदार यादीत घुसविले. रोहित पवारांनी स्वतःची पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांची नावे सुद्धा मतदार यादीत घुसविली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित 37 लोकांना मतदार केले त्याचबरोबर स्वतःच्या व्यवसायाशी संबंधित 56 लोकांना मतदार केले. पण मतदार यादीतला हा घोळ रोहित पवारांच्या अंगाशी आला. केदार जाधव ने मुंबई हायकोर्टात रोहित पवारांविरुद्ध याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी घेऊन मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक स्थगित केली. रोहित पवारांना दणका दिला. मतदार यादीतला घोळ जोपर्यंत निस्तरत नाही, तोपर्यंत निवडणूक घेता कामा नये असा स्पष्ट आदेश दिला.
रोहित पवारांना त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर चढविले, पण त्याच रोहित पवारांना जामखेड नगरपरिषद टिकवता आली नाही. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक सुद्धा नीट मॅनेज करता आली नाही. अशाप्रकारे महापालिका निवडणुका आणि किरकोळ संघटनात्मक निवडणुकांमध्ये पवार काका – पुतण्यांची हवा निघाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App