प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सरकारी चहापानावर बहिष्कार घातल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार जाहिरातीवर वारेमाप खर्च करत आहे. विकासकामांऐवजी उधळपट्टी सुरू आहे Ajit Pawar and eknath shinde targets each other over government expenses
गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील जेवणाचे बिल २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे. एवढे बिल कसे काय आले? सरकार चहामध्ये सोन्याचे पाणी घालते का?, असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबून न जाता अजितदादांच्या सवालाला त्यापेक्षा जास्त परखड उत्तर दिले आहे.
नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री?
अधिवेशनापूर्वी रविवारी झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. वर्षा बंगल्यावरील खर्चाच्या बिलाबाबत अजित पवारांनी केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘गेले अडीच वर्ष ‘वर्षा’ निवासस्थान बंद होते. आता गेल्या सहा-सात महिन्यांपासून ते सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यभरातून लोकं येतात. दररोज हजारो लोकं येतात. तुम्ही साक्षीदार आहात त्यांचे. त्यामुळे जे लोकं येतात, त्यांना आल्यानंतर पाणी पण नाही द्यायचं का? चहा पण नाही द्यायचा का? आम्ही काय बिर्याणी वगैरे देत नाही. पण चहापाणी तर देऊ शकतो की नाही आणि ही आपली संस्कृती, परंपरा आहे.
चहापाण्याचे अजितदादा तुम्ही काढताय. पण मला सांगा, ७० हजार कोटी तुम्ही पाण्यात घातलेत. पण ०.१ % एवढी जमीन सुद्धा सिंचनाखाली आली नाही. हे मी नाही, तुमचेच त्या वेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. मग त्याचा हिशेब आम्ही कधी विचारला का? पण तो हिशेबही तुम्हाला द्यावा लागेल.
अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या या सवाल-जबाबदामुळे महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन कसे रंगणार, याची झलक मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App