प्रतिनिधी
नाशिक : Agriculture Minister Kokate कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जमाफीच्या संदर्भात बोलताना शेतकऱ्यांनाच खडे बोल सुनावले होते. त्यांनी कर्जमाफीच्या पैशांचे तुम्ही काय करता? असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचा हिशोब विचारला होता. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी आपल्या त्या विधानावरून माफी मागितली. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.Agriculture Minister Kokate
दोन दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफीविषयी विचारणा केली. त्यावर कोकाटे यांनी कर्जमाफीच्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक करता का? असा सवाल करत शेतकऱ्यांनाच सुनावले होते. यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून टीका होत होती. टीकेची झोड उठल्यानंतर अखेर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले कृषिमंत्री कोकाटे?
शेतकऱ्यांची अनावधानाने आणि मस्करीत कुस्ती झाल्याने असे वक्तव्य केल्याचे कोकाटे म्हणाले. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो , असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. गेले 8 दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाईल, असे आश्वासन माणिकराव कोकाटे यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणूनच राम नवमीचा मुहूर्त साधून आज मी जाणीवपूर्वक काळाराम मंदिरात दर्शनास आलो होतो. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी मी प्रभू रामचंद्राकडे समृद्धी आणि सुख मागितले आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांसाठी आगामी दिवस हे निश्चितच चांगले असतील, यावर माझा विश्वास आहे, असेही कोकाटे म्हणाले.
कृषिमंत्री पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर
दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यातील बागलान, सटाणा परिसरात जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. या परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, डाळ, टोमॅटो, गहू आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या माडसांगवी परिसरातील द्राक्ष बागांचा झालेल्या नुकसानीची पाहणी माणिकराव कोकाटे यांनी केली होती. याच दौऱ्यादरम्यान कर्ज माफीबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अशातच आता कृषिमंत्री पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App