नाशिक : शरद पवारांबरोबर जाऊन जयंत पाटलांना मिळाला धोका; म्हणून आता शेकापने ठाकरे बंधूंच्या बरोबर जाऊन श्रावणात बांधला राजकीय झोका!!, असे राजकीय चित्र आज रायगड जिल्ह्यात दिसले.
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्य भाषण मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे झाले, तर उप भाषण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचे झाले. यातून शेतकरी कामगार पक्ष आणि ठाकरे बंधू यांचे नवे राजकीय गुळपीठ महाराष्ट्राच्या समोर आले.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे एका वर्षभरापूर्वीच शरद पवार यांच्यावर विसंबून राहिले होते. जुलै 2024 मध्ये जयंत पाटलांनी पवारांवर विश्वास ठेवून महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. परंतु त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शरद पवारांच्या राजकीय खेळीला प्रतिसाद दिला नाही. उलट उद्धव ठाकरे यांनी आपले पीए मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची मते नार्वेकरांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे जयंत पाटलांना मते कमी पडली आणि ते विधान परिषद निवडणुकीत पराभूत झाले होते. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला देखील शिवसेनेतली काही मते फोडून जयंत पाटलांना निवडून आणता आले नव्हते.
व्यासपीठ शेकापचे, अजेंडा मनसेचा
शरद पवारांच्या बरोबर गेल्याचा जयंत पाटलांना प्रतिकूल अनुभव आला. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने ठाकरे बंधूंशी संधान बांधले. शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात आजही अस्तित्वात आहे हे तुम्हाला रायगड मधल्या मेळाव्यात दिसेल, असे जयंत पाटील म्हणाले. तो मेळावा आज झाला. पण त्या मेळाव्यात मुख्य भाषण जयंत पाटलांचे होण्याच्या ऐवजी राज ठाकरेंचे मुख्य भाषण झाले त्यांनी आपला सगळा भर मनसेचा मराठी अजेंडा पुढे रेटण्यावर दिला. अर्बन नक्षलवादाचा मुद्दा छेडून त्या वादाला नवी फोडणी दिली. मराठी माणसांच्या जमिनी, गुजरात मधल्या जमिनी, मोदी शाहांचे गुजरात प्रेम हे मनसेचे मुद्दे त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर आणून शेतकरी कामगार पक्षाच्या मूळ विषयालाच बगल दिली. राज ठाकरेंच्या मुख्य भाषणातून शेतकरी कामगार पक्षाच्या मूळातल्या अजेंड्यालाच धक्का बसला.
त्या उलट संजय राऊत यांनी थोडा तरी शेतकरी कामगार पक्षाचा अजेंडा चालविला. त्यांनी भाषिक वादाच्या पुढे जाऊन शेतकरी आणि कामगार यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न केला. पण त्यांची सगळी मांडणी सत्तेशी संलग्न ठरली यशवंतराव मोहिलेंसारखे यशस्वी अर्थमंत्री शेतकरी कामगार पक्षाने दिले, याची आठवण त्यांनी सगळ्यांना करून दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना रायगड जिल्ह्यामध्ये अखंड शिवसेनेचा प्रमुख संघर्ष शेतकरी कामगार पक्षाशी होता. शेकापशी संघर्ष करून तिथे शिवसेना वाढली पण दोन्ही पक्षांची अवस्था बिकट झाल्यानंतर हे दोन्ही पक्ष आज एकत्र दिसले. दोघांनी एकमेकांना राजकीय टेकू द्यायचा प्रयत्न केला. पण यात मुख्य चित्र समोर आले, ते हेच की पवारांकडून धोका मिळाल्यानंतर जयंत पाटील ठाकरे बंधूंच्या जवळ गेले आणि म्हणूनच त्यांना शेकापच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून बोलविले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App