विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत येत्या आठ मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या ७ मार्चनंतर प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जाईल, असे ठाकरे – पवार सरकारने जाहीर केले आहे. जर येत्या 8 मार्चपासून महापालिकेत प्रशासकाची नेमणूक झाली, तर शिवसेनेच्या सत्तेतील हे पहिले प्रशासक ठरणार आहेत. तब्बल 36 वर्षांनी मुंबई महापालिकेत प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. एप्रिल 1984 मध्ये पहिल्या प्रशासकाची नेमणूक झाली होती. द.म. सुखटणकर हे या महापालिकेतील पाहिले प्रशासक होते. Administrator to sit in Mumbai Municipal Corporation for the first time during Shiv Sena rule !!
मुंबई महापालिकेचे 1985 मध्ये शिवसेनेची पहिली सत्ता आली. त्यापूर्वी 1971 – 72 मध्ये डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्या रूपाने शिवसेनेचे पहिले महापौर बनले असले तरी आणि त्यानंतर सुधीर जोशी, मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे महापौर बनले असले तरी शिवसेनेची पहिली सत्ता आली ती १९८५-८६ मध्ये. छगन भुजबळ हे महापौर बनले आणि तिथून 1991 – 92 पर्यंत सेनेची सत्ता होती. परंतु 1992 च्या निवडणुकीत काँग्रेसला अफाट यश मिळाले आणि केवळ काँग्रेसचे 112 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर चंद्रकांत हंडोरे महापौर बनल्यानंतर अवघ्या चार वर्षांतच ही सत्ता शिवसेनेने काबीज केली. 1996 – 97 मध्ये काँग्रेसची मते फोडून मिलिंद वैद्य हे महापौर बनले तेव्हापासून ते आजतागायत शिवसेनेची सत्ता महापालिकेवर कायम आहे. तब्बल 25 वर्षे मुंबई महापालिकेवर सेनेचा झेंडा अविरत फडकत आहे.
मात्र, मुंबई महापालिकेत 1985 मध्ये शिवसेनेची सत्ता येण्यापूर्वी 1 एप्रिल ते 11 नोव्हेंबर 1984 मध्ये प्रथमच द. म. सुखटणकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली होती. तर पुढे 12 नोव्हेंबर 1984 ते 9 मे 1985 या कालावधीत जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार आणि निवडणूक कार्यक्रम नियोजित वेळेत जाहीर न झाल्यास तब्बल 36 वर्षांनी मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची वेळ येणार आहे. तसे झाल्यास शिवसेनेची असताना प्रथमच प्रशासक नेमला जाणार आहे.
विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेची सत्ता असताना सेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत प्रशासक नेमला जाणे हाही वेगळा योगायोग ठरणारा आहे. जर 8 मार्च पासून प्रशासक नेमण्याची कार्यवाही झाल्यास विद्यमान आयुक्त इक्बाल सिंह चहल हे प्रशासक म्हणून नेमले जातील. आणि ते सुखटणकर, कांगा याच्या पंक्तीत जाऊन बसतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App