विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेची अतिशय संथगतीने छपाई सुरू असून यासंदर्भातील वृत्ताला आता मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत परावर्तित केले आहे. किमान आतातरी या प्रक्रियेतील गतिरोध दूर करून तातडीने या कामाला गती देण्यात यावी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र पाठवून केली आहे.Accelerate the cof Dr. Ambedkar’s books !; Letter of Devendra Fadnavis to the Chief Minister
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आपल्यावरील शस्त्रक्रियेनंतर आपण घरी परतलात, हे ऐकून आनंद झाला. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधतो आहे. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान ज्यांनी भारताला दिले, त्या भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेच्या प्रकाशन कार्याची प्रचंड दुरवस्था होत आहे. आपण तातडीने या कामात लक्ष देण्याची आणि त्यादृष्टीने संबंधितांना निर्देश देण्याची नितांत गरज आहे.
२०१७ मध्ये राज्यात आमचे सरकार असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे खंड १८ -भाग १, भाग २ आणि भाग ३ यांच्या मुद्रण आणि प्रकाशनासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला होता. या तीन खंडांच्या सुमारे १३ हजारावर अंकांची छपाई करून त्याचे वितरण सुद्धा सुरू करण्यात आले होते.
अनेक ग्रंथांचे प्रकाशन आमच्या काळात करण्यात आले. काही ग्रंथांच्या ५० हजार प्रती छापून त्याचे वितरण सुद्धा झाले. मात्र, तदनंतरच्या काळात गेल्या ४ वर्षांत केवळ २० हजार अंकांचीच छपाई होऊ शकली आहे आणि या अंकांची प्रचंड मागणी असताना सुद्धा वाचक, अभ्यासक, विद्यार्थी यांना त्यासाठी खोळंबून रहावे लागत आहे.
आमचे सरकार असताना भाषणांच्या या तीन खंडांसह ‘बुद्धा अँड हिज धम्मा’, ‘पाली ग्रामर अँड पाली डिक्शनरी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अँड हिज इगॅलीटेरियन मुव्हमेंट’ अशा एकूण ९ खंडांच्या प्रत्येकी १ लाख प्रतींची छपाई करण्याचे आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे ५.५ कोटी रूपयांच्या कागदाची खरेदी सुद्धा शासकीय मुद्रणालयामार्फत करण्यात आली होती.
मात्र, केवळ मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीच्या अभावातून हे काम रखडत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. ९ लाख प्रतींच्या बदल्यात केवळ २०हजार अंकांची छपाई हे प्रमाण अजीबातच पटण्यासारखे नाही. या सर्व बाबींची दखल काल, दि. २ डिसेंबर २०२१ रोजी स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा घेतली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हा अनमोल सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक आणि ऐतिहासिक ठेवा आहे.
मला वाटते की, किमान या कामात तरी खर्च आणि मनुष्यबळाच्या निर्बंधाचे मापदंड लागू नयेत. त्यापुढे जाऊन, थोडा वेगळा विचार करून ही ग्रंथसंपदा विपुल प्रमाणात उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असताना ग्रंथच उपलब्ध नसणे, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे आपण तातडीने या विषयात लक्ष घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ग्रंथ छपाईतील ढिसाळपणा दूर करावा, ही आग्रहाची विनंती आहे.
सोबतच गतीने त्या ग्रंथांचे वितरण होईल, याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. त्या आधी काही ठोस निर्णय घेऊन आपण दिलासा द्याल, अशी अपेक्षा आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App