विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : Aamshya Padavi : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी 30 तारखेला ‘उलगुलान’ मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. त्यानंतर सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जीआर काढला. यामुळे ओबीसी समाज नाराज होऊन त्यांनी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. सरकारने मराठ्यांना ओबीसीच्या हक्काचे आरक्षण दिले जाणार नाही, असे स्पष्ट केल्याने ओबीसी समाजाची नाराजी काहीशी निवळली. अशातच बंजारा समाजाने मागणी केली की, जर मराठ्यांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण दिले जात असेल, तर आम्हालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे. यासाठी बंजारा समाजाने बीड, पुणे आणि जालना येथे मोर्चांचे आयोजन केले. आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजातील काही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलल्याचेही दिसून आले.
बंजारा समाजाच्या पाठोपाठ धनगर आणि वंजारी समाजांनीही एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरली आहे. तसेच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी धोबी आणि नाभिक समाजाला एनटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आरक्षणाच्या मागण्यांमुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे. एसटी प्रवर्गातील आरक्षणात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आता एसटी समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी आमदार आमश्या पाडवी यांनी इशारा दिला होता की, जर सरकारने कोणत्याही समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला, तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू. यापूर्वी आदिवासी आमदारांनी एकत्र येऊन बैठक घेतली होती आणि एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या घुसखोरीला रोखण्यासाठी सरकारला निवेदन दिले होते. आता याच मागणीसाठी आमदार आमश्या पाडवी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सांगितले की, एसटी प्रवर्गातील घुसखोरी रोखण्यासाठी राज्यातील आदिवासी समाज 30 तारखेला नंदुरबार येथे ‘उलगुलान’ मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
‘उलगुलान’ या शब्दाचा अर्थ क्रांती किंवा विद्रोह असा आहे. बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारण्यासाठी उलगुलान आंदोलन सुरू केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App