नाशिक : मनोज जरांगे यांनी आंदोलन करून मिळवलेल्या मराठा आरक्षणाचा राजकीय डाव आता उघड्यावर आला असून आत्तापर्यंत गावचे राजकारण “सरकार”, 96 कुळी, 92 कुळी मराठे म्हणून हाताळणाऱ्या गाव पुढार्यांनी कुणबी दाखले काढून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवायची तयारी चालविल्याचे समोर आले आहे. 96 kuli Marathas
लग्नाच्या सोयरिकी जुळवताना आणि गावातले राजकारण हाकताना आपण 96 कुळी, 92 कुळी मराठा असल्याचे मिरवणारे नेते आता OBC आरक्षणाच्या जागांवर आपली सोय लावून घेण्यासाठी कुणबी दाखले काढत असल्याची उदाहरणे पश्चिम महाराष्ट्रातून समोर आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर पंचायती, नगर परिषदा यांची आरक्षणे जाहीर झाली. त्यामध्ये ओबीसी आरक्षण मोठ्या प्रमाणावर जाहीर झाली. त्यामुळे अनेक गाव पुढाऱ्यांच्या “संधी” गेल्या. परंतु त्या “संधी” वेगळ्या मार्गाने मिळवण्यासाठी गाव पुढार्यांनी आपल्या पत्नीच्या नावे कुणबी दाखले काढून ओबीसी आरक्षणांमधून निवडणुका लढवायची तयारी चालवली. अनेक गावांमध्ये इच्छुकांनी दिवाळी शुभेच्छांच्या पोस्टर्सचा धडाका लावून निवडणूक लढवायची इच्छा प्रकट केली. त्यातूनच कुणबी दाखल्यांचे हे गौडबंगाल उघड झाले. दिवाळी शुभेच्छांची पोस्टर्स लावणारी अनेक राजकीय घराणी अनेक वर्षे गावांवर, पंचायत समित्यांवर राज्य करताना 96 कुळी मराठा म्हणून मिरवत होती. ती “अचानक” “कुणबी” झाली आणि ओबीसी गट गणांमध्ये आणि वॉर्डांमध्ये त्यांची पोस्टर्स झळकली. पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये हे चित्र सर्रास दिसून आले.
पश्चिम महाराष्ट्रातला ट्रेंड
सकाळचे राजकीय प्रॉडक्ट असलेल्या सरकारनामा वेब पोर्टलने कोल्हापूर जिल्ह्यातले याच स्वरूपातले चित्र सविस्तरपणे मांडले. परंतु केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरताच कुणबी दाखले काढण्याचा प्रकार राहिलेला नसून पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यांमधून सुद्धा हाच प्रकार समोर आलाय. या जिल्ह्यांमध्ये 96 कुळी मराठ्यांनी सुद्धा कुणबी दाखले स्वतः काढून किंवा आपल्या पत्नीच्या नावे काढून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मैदानात उतरायची तयारी चालू केली आहे.
मराठा राजकीय घराण्यांचा डाव
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण आंदोलन केले, त्यावेळी सुरुवातीला त्यांना फक्त आरक्षण हवे होते. परंतु, नंतर त्यांनी भूमिका बदलून मराठा समाजाला फक्त OBC मधूनच आरक्षण पाहिजे, असा हट्ट केला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आग्रह धरला. तो फडणवीस सरकारने मर्यादित प्रमाणात मान्य केला, पण आता त्यामागचे राजकीय गौडबंगाल उघड झाले. गावांवरचे, पंचायत समित्यांवरचे आणि जिल्हा परिषदांवरचे परंपरागत वर्चस्व टिकवण्यासाठी 96 कुळी मराठा राजकीय घराण्यांनी कुणबी दाखले काढायचा मार्गावर अवलंबिला. आता प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी मराठा – आणि OBC राजकारणाचे अनेक पदर संपूर्ण महाराष्ट्र समोर उलगडतील. त्यावेळी आणखी किती मोठा आणि कोणता संघर्ष उडेल हे लवकरच उघड्यावर येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App