विशेष प्रतिनिधी
पुणे : वाचनसंस्कृती सक्षम करण्यासाठी सुरू झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवाने इतिहास रचला असून, यंदाच्या महोत्सवाला १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या नागरिकांनी तब्बल २५ लाख पुस्तके खरेदी केल्याने, पुस्तक महोत्सवातून ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुनलेत ही उलाढाल चौपट आहे. या महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रेम दिल्याने, महोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी रविवारी दिली. 2.5 million books purchased by reading enthusiasts
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. हा महोत्सव १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात आला होता. या महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद देत तीन दालनांमधील ७०० स्तोलामधून लाखो पुस्तकांची खरेदी केली आहे. यासोबतच पुणे बाल चित्रपट महोत्सव, मुलांसाठी विविध कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुणे लिट फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती राजेश पांडे यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी साडेचार लाख नागरिकांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देत, ११ कोटी रुपयांची पुस्तके खरेदी केली होती. मात्र, यंदा नागरिकांनी ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची पुस्तके खरेदी केली. त्यामुळे यंदाच्या पुस्तकाला चौपट प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचा भाग बनलेले आणि पुस्तक खरेदीत सहभागी झालेल्यांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यात ५० टक्के तरूण, २५ टक्के लहान मुले सहभागी झाली होती, हे आश्वासक चित्र पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे दीड लाख शालेय विद्यार्थी व तितकेच महाविद्यालयीन तरुण यात सहभागी झाले होते. या महोत्सवात आलेल्या वाचनप्रेमींनी तब्बल ४० कोटी रुपयांची २५ लाखांपेक्षा अधिक पुस्तके खरेदी केली आहेत. त्यामुळे वाचन करणारे पुस्तके खरेदी करून वाचतात, हे सिद्ध झाले आहे.
या महोत्सवाला सोशल मीडियावरही प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा एक कोटींहून अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने आस्वाद घेतला.या महोत्सवात १०० हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे किमान १ हजार लेखकांनी पुस्तक प्रदर्शनात भेट दिली.सांस्कृतिक वातावरणात हा महोत्सव न्हाऊन निघाला. २५ पेक्षा अधिक , तर ६५ पेक्षा अधिक नृत्य, नाट्य व संगीताचे कार्यक्रम झाले. त्याचा २ लाखांहून अधिक रसिकांनी त्यांचा आस्वाद घेतल्याची माहिती राजेश पांडे यांनी दिली आहे.
लिटरेचर फेस्टिव्हल हे पुणे पुस्तक महोत्सवाचे यावर्षीचे नवे वैशिष्ट्य होते. यात ५० पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किर्तीचे महानुभाव सहभागी झाले होते. त्यांच्या कार्यक्रमांना दर्दीनी तुडुंब गर्दी केली. त्यात ३५ हून अधिक कार्यक्रम झाले. दिड लाखांहून अधिक पुस्तके वाचकांना सप्रेम भेट देण्याल आली, अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली.
या महोत्सवात एकूण ४ विश्वविक्रम झाले. हे विश्वविक्रम पुस्तकांच्या सहभागानेच झाले. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने, संविधानाच्या मुखपृष्ठाचे शिल्प पुस्तकांच्या साहाय्याने तयार करण्यात आले. त्यासाठी ९७ हजार २० हजार पुस्तकांचा वापर केला गेला, असे राजेश पांडे यांनी सांगितले.
पुणेकरांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भरभरून प्रेम दिले आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नागरिकांनी पुणे पुस्तक महोत्सवाला आणि लिट फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे या महोत्सवाची उंची वाढली आहे. आता हा महोत्सव आंतरराष्ट्रीय होण्यासाठी आणि पुणे शहराला पुस्तकांचे शहर अशी नवी ओळख देण्यासाठी काम करायचे आहे, असे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App