प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात रश्मी ठाकरे यांच्या नावावरच्या 19 बंगल्यांच्या मुद्द्यावर जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला असताना मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वादाच्या ठिणगीचे रूपांतर राजकीय आगीत होण्याची चिन्हे आहेत.19 Bungalows vs. Juhu’s Bungalow
नारायण राणे यांच्या जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. महापालिकेचे पथक राणेंच्या बंगल्यात तपासणीसाठी जाणार असून अनधिकृत बांधकामाचे मोजमाप हे पथक करणार आहे.
रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले : किरीट सोमय्या – शिवसेना संघर्ष आज कोर्लाई गावाभोवती केंद्रित!!
मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्डकडून राणेंना मुंबई महापालिका कायदा, १८८८ च्या कलम ४८८ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. यात म्हटले आहे की, जुहू तारा रोडवरील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी के-पश्चिम वॉर्डच्या इमारत प्रस्ताव विभागाचे पथक येईल. अनधिकृत बांधकामाची पडताळणी या पथकाकडून केली जाईल. बंगल्याच्या बांधकामासाठीची कागदपत्रे तयार ठेवण्यासंदर्भात नोटीस पाठवली गेल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन
चार वर्षांपूर्वी तक्रार करूनही बंगल्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नसल्याची आठवण माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी महापालिकेला करून दिली. त्यानंतर महापालिकेने राणेंना नोटीस पाठवली. अधिश बंगला गेल्या काही वर्षांपासून वादात आहे. सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून बंगल्याचे बांधकाम झाल्याचे दौंडकर यांनी सांगितले. हा बंगला समुद्र किनाऱ्यापासून ५० मीटरवर आहे. त्यामुळे सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दौंडकर यांनी म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंगल्याच्या तपासणीनंतर अनधिकृत बांधकामे आढळून आल्यास आणखी एक नोटीस बजावली जाईल. बंगल्याची वैधता दाखवून देण्यासाठी त्यांना ठराविक वेळ देण्यात येईल. कायदेशीर कागदपत्रे दाखवण्यात अपयशी ठरल्यास पाडकामाची कारवाई करण्यात येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App